महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या हल्लाबोल महामोर्चासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय सहभागी झाला होता असा दावा मविआच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या मोर्चात केवळ काही हजारांमध्ये गर्दी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार या मोर्चात ६० ते ६५ हजार लोक सहभागी झाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा लाखोंच्या गर्दीचा दावा फोल ठरला आहे.
( हेही वाचा : भाजप म्हणतंय, दादा, नाना जागे व्हा! )
महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी मुंबईत सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची चर्चा देशभरात सुरु होती, राज्यभरातून या मोर्चामध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित राहणार असे दावे केले जात होते. दोन आठवड्यांपासून महाविकास आघाडीकडून या मोर्चाची जय्यत तयारी सुरु होती, महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर मोर्चासाठी गर्दी जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या मोर्चासाठी राज्यभरातून जवळपास दोन ते अडीच लाखांच्या संख्येने जनसमुदाय येण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वर्तविण्यात आली होती. भायखळा जिजामाता उद्यान (राणीबाग) येथून मोर्चाची सुरुवात होणार होती, मात्र दोन दिवस अगोदर काही कारणास्तव या मोर्चाचे ठिकाण बदलून नागपाडा येथील रिचर्ड अँड क्रुडास या कंपनीजवळ ठेवण्यात आले.
शनिवारी सकाळी १० वाजता रिचर्ड अँड क्रुडास या कंपनीजवळ मोर्चेकरी आणि नेते जमायला सुरु झाली होती, बाराच्या सुमारास हा मोर्चा सर जे.जे. उड्डाण पुलावरून सीएसएमटी, टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ दुपारी दिडच्या आसपास आला. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन अडीच वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा संपला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या मोर्चात ६० ते ६५ हजारांच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडून या मोर्चाची आकडेवारी काढण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अडीच ते तीन लाखांचा संख्येने लोक मोर्चात सहभागी होते असा दावा करण्यात आला होता. परंतु पोलिसांच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा फोल ठरला आहे.
Join Our WhatsApp Community