शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर, भाजपसोबत युती करुन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. आता ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. बुधवारी रात्री या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
याआधी ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत, पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नगरसेवकही शिंदे गटाकडे वळल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे.
काही महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता
ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काॅंग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून, प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community