भारतापुढे युरोपीयन युनियन नरमले… या देशांनी दिले कोविशिल्डला ग्रीन पासमध्ये स्थान

आता युरोपीयन युनियन मधील 8 देशांनी कोविशिल्डला आपल्या ग्रीन पासमध्ये मान्यता दिली आहे.

90

युरोपीय युनियन मधील देशांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रीन पासमध्ये मान्यता देण्यात आलेल्या लस घेणे आवश्यक आहे. या पासमध्ये काही ठराविक लस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच युरोपात प्रवेश करण्यास परवानगी आहे. परंतु यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीला मान्यता देण्यात आली नव्हती. त्यामुळे याबाबत भारताकडून कठोर भूमिका घेतल्यानंतर, आता युरोपीयन युनियन मधील 8 देशांनी कोविशिल्डला आपल्या ग्रीन पासमध्ये मान्यता दिली आहे.

या देशांनी दिली परवानगी

आतापर्यंत ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, ग्रीस, आयर्लंड, आइसलँड, स्पेन आणि स्वित्झर्लंड या युरोपीयन देशांकडून कोविशिल्डला ग्रीन पास मध्ये परवानगी देण्यात आली आहे. लवकरच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सुद्धा मान्यता देण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

भारताने घेतली कठोर भूमिका

जोपर्यंत लसीला मान्यता देण्यात येणार नाही तोपर्यंत युरोपीयन युनीयन मधील देशांत जाणा-या नागरिकांना कॉरंटाईन करण्याची सक्ती करण्यात आली होती. या अटीवरुन मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून कठोर भूमिका घेण्यात आली होती. जर कॉरंटाईनची सक्ती करण्यात येत असेल, तर भारतात सुद्धा एक परस्पर धोरण राबवण्यात येईल. जोपर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला युरोपीयन युनियनमधील देशांकडून मान्यता देण्यात येत नाही, तोपर्यंत भारतात सुद्धा युरोपियन युनियनमधील देशांतून येणा-या नागरिकांना कॉरंटाईन करण्याची सक्ती करण्यात येईल, असे भारताकडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते.

कोविशिल्डला दिली नव्हती मान्यता

युरोपियन युनियनच्या वैद्यकीय नियामक मंडळातील युरोपियन मेडिसीन एजन्सीने चार लसींना मान्यता दिली होती. यामध्ये अॅस्ट्राझेनेका तर्फे युरोपात तयार करण्यात आलेल्या आणि विक्री होत असलेल्या व्हॅक्सर्व्हेरिया लसीचा समावेश करण्यात आला होता. पण अॅस्ट्राझेनेकातर्फेच भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होत असलेल्या कोविशिल्डला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे कोविशिल्ड घेतलेल्या भारतीयांना युरोपात जाण्यासाठी ग्रीन पास मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. त्यानंतर सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला आणि भारत सरकारकडून याबाबत गंभीर दखल घेण्यात आली.

अदर पुनावाला यांनी दिले होते आश्वासन

याची दखल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी घेतली होती. याबाबत आपण नक्कीच ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले होते. कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना युरोपियन युनियन मधील देशांत प्रवास करण्यासाठी अडथळा येत असल्याचे मला कळले आहे. मी याबाबतची दखल घेतली असून, नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून मी नक्कीच उच्च स्तरावर प्रयत्न करेन, असे आश्वासन अदर पुनावाला यांनी दिले होते. देशांसोबत चर्चा करुन राजकीय आणि नियामक पातळीवर हा तिढा लवकरात लवकर सोडवण्यात येईल अशी आशा व्यक्त करतो, असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.