राज्यात एकीकडे हनुमान चालिसा पठणावरून रणकंदन सुरू असताना आता मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त हनुमान चालिसाचे पठण केले जाणार आहे. त्यामुळे ‘जय श्रीराम’च्या नाऱ्यानंतर आता मोदी सरकारकडून ‘जय हनुमान’चा नारा देशभरात गुंजणार असल्याचे सांगितले जात आहे.
मोदी सरकारच्या अष्टपूर्तीचा असा आहे प्लान
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारची अष्टपूर्ती झाल्यानिमित्त देशभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमान चालिसा पठण केले जाणार आहे. येत्या 26 मे रोजी मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी परिषद, युवा परिषद आणि मागासवर्गीयांसाठी परिषदा आयोजित केल्या जातील. त्याचबरोबर देशातील मंदिरांमध्ये त्यांच्या स्तरावर पूजेचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिला आंदोलनाचा इशारा!)
भाजपकडून सप्ताह बुथ कमिटी टीम तयार
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या मते, सरकारने देशात उज्ज्वला, जन धन, हर घर नल अशा अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला आहे. देशभरात उत्सवासोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने सप्ताह बुथ कमिटी टीम तयार केली आहे. या समितीमध्ये 4 ते 5 सदस्य असतील, जे देशभरात भाजप कमकुवत असलेल्या जागांवर भाजपच्या ताकदीसाठी काम करतील.