महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (२८ जून) मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा आधार देणाऱ्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर विस्तृत प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अजित पवार यांनी विधिमंडळात मांडलेला अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि कल्याणकारी असून राज्यातील विकासकामे व विविध योजना पुढे घेऊन जाणारा आहे. माजी अर्थमंत्री म्हणून मी या अर्थसंकल्पाचे स्वागत करतो. (Budget Session 2024)
या अर्थसंकल्पातून शासनाने शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा आधार देणाऱ्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. विशेष करून मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होणार असून देशातील ही सर्वात मोठी योजना आहे. यासोबतच पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांचे शिक्षण सुलभ आणि सहज व्हावे या दृष्टीने आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना शिक्षणात १००% सवलत देण्याचा क्रांतिकारी निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. (Budget Session 2024)
(हेही वाचा – Maharashtra Budget 2024: महिला पूरक अर्थसंकल्प – शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा)
शिवराज्याभिषेक सोहळा शासनाच्या माध्यमातून दरवर्षी होणार साजरा
१४,७०० कोटी रुपयांचे अनुदान देत ४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विजेत शंभर टक्के सूट जाहीर केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या संकल्पनेला गती प्राप्त होणार आहे. रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळा आता शासनाच्या माध्यमातून दरवर्षी साजरा करण्यात येणार ही घोषणा शिवप्रेमींमध्ये चैतन्य आणि उत्साह भरणारी आहे. याशिवाय राज्यातील महिलांना, बेरोजगार युवक तसेच विद्यार्थ्यांना दरमहा अनुदान देण्याची, गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान या सर्व योजना अभिनंदनीय आहेत. (Budget Session 2024)
सांस्कृतिक कार्य विभाग, वन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागांसाठी या अर्थसंकल्पात केलेल्या वित्तीय तरतूदी या समाधानकारक असून त्यातून हाती घेतलेल्या योजना नक्कीच पूर्ण होतील, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. या अर्थसंकल्पामुळे विरोधी पक्ष विचलित होऊन, त्यांच्याकडून दोष काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जाईल; परंतु राज्यातील जनता त्यांच्या या खोट्या प्रचाराला बळी पडणार नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेच्या हितार्थ निर्णय घेत असलेल्या या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा मला विश्वास आहे. (Budget Session 2024)