राज्याचा कारभार ज्या इमारतीतून हाकला जातो, त्या मंत्रालयातील फोन बुधवारी खणाणला. तो फोन होता शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातून…
“मी सिल्व्हर ओकमधून शरद पवार बोलतोय.”
असा आवाज फोनवरुन आला. धक्कादायक म्हणजे प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्यांसंदर्भात हा फोन करण्यात आला होता. त्यानंतर मात्र मंत्रालयात एकच गोंधळ उडाला. या कॉलबाबत संशय आल्याने अधिक चौकशी केल्यानंतर जे कळलं, त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. हा फोन शरद पवार यांनी नाही, तर त्यांच्या आवाजाची नक्कल करत सिल्व्हर ओकमधून करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.
कोणी केला फोन?
फोन करणाऱ्याने शरद पवार यांचा हूबेहूब आवाज काढत सिल्व्हर ओकमधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्यांसंदर्भात संदर्भात बोलणेही केले. या कॉल संदर्भात संशय येताच मंत्रालयातील वरिष्ठ दर्जाच्या अधिका-यांनी खात्री करण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर कॉल केला. त्यावेळी साहेबांनी असा कुठलाही कॉल केला नसल्याचे समोर आले. त्यानंतर मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-याच्या तक्रारीवरुन बुधवारी रात्री उशिरा गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. हा फोन नेमका कोणी केला, याबाबत अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही.
चौकशीसाठी एक जण ताब्यात
यानंतर संपूर्ण यंत्रणा वेगाने कामाला लागली असून, खंडणी विरोधी पथकाने रातोरात याप्रकरणी पुण्यातील जेऊर येथून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे याबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाज काढत कॉल केला होता, या संदर्भात पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली आहे. तसेच कोणत्या अधिका-यांच्या बदल्यांबाबत हा फोन करण्यात आला होता, याचीही माहिती पोलिसांनी गुलदस्त्यातच ठेवली आहे.
Join Our WhatsApp Community