जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांच्यावर आमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यावेळी अचलपूर घटनेच्या त्या मास्टर माईंड असल्याचे म्हटले होते. काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी अनिल बोंडे यांच्या विरोधात मंगळवारी दुपारी तक्रार दाखल केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकून यांची व शासनाची बदनामी केली. त्याचबरोबर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्याने बोंडेंविरोधात गुन्हा दाखल करावा. त्यांना अटक करावी, अशी तक्रार मोहोड यांनी केली होती. याप्रकरणी बोंडे यांच्या विरूद्ध अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
काय म्हणाले अनिल बोंडे?
दुर्देव आहे की या दंगलीबाबत अभय म्हात्रे मास्टरमाईंड असल्याच्या बातम्या आल्या. पण म्हात्रे हा मास्टरमाईंड नाही तर या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे आहेत, त्यामुळे तेच याचे मास्टरमाईंड आहेत. कारण अमरावतीत १२ नोव्हेंबरमध्ये ४०,००० मुस्लिमांनी दंगल घडवून आणली. त्यानंतर अचलपूरमध्ये काश्मीर फाईल पाहून आलेल्या मातंग समाजातील मुलांनी भारत माता की जय म्हटले म्हणून हल्ला झाला. म्हणून अमरावतीत होत असलेल्या दंगलींना एकमेव काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच जबाबदार आहेत, असे वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले होते.
(हेही वाचा – ‘या’ नागरिकांनी मास्क वापरावेत, कोरोना नियंत्रणासाठी आरोग्यमंत्र्यांचं आवाहन)
यशोमती ठाकूर यांचा बोंडेंवर आरोप
अमरावती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे वैफलग्रस्त अवस्थेत असल्याचे म्हटले. अनिल बोंडेचा अमरावतीत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असून पोलीस तपास करत आहेत. बोंडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असेही ठाकूर म्हणाल्या होत्या. अमरावतीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अमरावतीचे वातावरण खराब करण्याचे काम करण्यात आले आहे. सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचा राजकीय प्रयत्न केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर आज अनिल बोंडे यांच्या विरोधात गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community