महेश आहेर हल्ला प्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल

127

ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नौपाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. भादंवी कलम 353,307,332,506(2),143,148,149,120(ब), या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदवण्यात आला आहे.

बुधवारी महेश आहेर यांच्यावर हल्ला

बुधवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केल्याची घटना घडली. महेश आहेर यांना तत्काळ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव आहेत.

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे बुधवारी सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली. आहेर यांच्या बचावासाठी सुरक्षारक्षक धावले. काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.

( हेही वाचा: भारतीय भाषांचे ज्ञान संस्कृतमध्ये नेण्याची गरज – सरसंघचालक )

आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी 

जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासंबंधी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. त्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांनी नौपाडा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल होणा-या या ऑडिओमध्ये त्यांना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.