मुंबईतील प्रभादेवी, दादर परिसरात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी रात्री जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी दादर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. यानंतर रविवारी सकाळपासूनच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह काही बडे नेते सक्रिय होऊन दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी सावंत यांनी सदा सरवणकरांवर चांगलेच आरोप केले. यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – नागरिकांनी तक्रारी, अर्ज विभागीय मुख्यमंत्री कार्यालयात सादर करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन)
सदा सरवणकर यांनी राडा झाला त्या ठिकाणी आणि दादर पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा दोन ठिकाणी आपल्या पिस्तुलातून फायरींग केले. आमचे शिवसैनिक याची तक्रार दाखल करायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.
शिवसैनिकांनी सरवणकरांचे बॅनर्स फाडले
दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिक आणखीच आक्रमकर होत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही शिवसैनिकांनी दादर परिसरातील समाधान सरवणकर आणि सदा सरवणकरांचे बॅनर्स फाडण्यास सुरूवात केली तर काही ठिकाणी दगडफेकही केली. यामुळे दादरमधील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community