-
प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्याची आग्रही मागणी केली आहे. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी लावून धरली. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे झाले असून, या जिल्ह्यात संभाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी आणि शौर्याचा महामेरू असणारे योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपले बलिदान दिले. त्यांच्या नावाने असलेल्या छत्रपती संभाजी नगरात त्यांचे भव्य स्मारक उभारले जावे. राज्य सरकारने संगमेश्वर येथे स्मारकाची घोषणा केली आहे, पण त्यासोबतच संभाजी नगरातही स्मारक व्हावे.” या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री आणि राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
(हेही वाचा – इंडी आघाडी एकसंध असावी; Kapil Sibal यांचा इंडी आघाडीला घरचा आहेर)
औरंगजेबाच्या कबरीवरून वाद नको
खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरही आठवले (Ramdas Athawale) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “औरंगजेबाची कबर पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, ती काढण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य औरंगजेब जिंकू शकला नाही. महाराष्ट्राच्या मातीत तो गाडला गेला आहे. ही कबर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. आम्ही त्याला या मातीत गाडले आहे. यावर आता वाद नको, सर्वांनी शांतता राखावी,” असे आवाहन त्यांनी केले.
आठवले (Ramdas Athawale) यांची ही मागणी ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. छत्रपती संभाजी नगरात स्मारक उभारण्याच्या मागणीला वारकरी आणि इतिहासप्रेमींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community