वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना शिकवणार धडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

काॅंग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्रातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याबाबत वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांच्याशी बोलून त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मंगळवारी ५ जुलै रोजी मुख्यमंत्री वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

आता आमचे सरकार आहे. हिंदुत्वाच्या विचारांचे लोक सरकारमध्ये आहेत. काॅंग्रेसने नेहमीच वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यामुळे वीर सावरकरांचा अवमान करणा-यांना धडा शिकवणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली.

‘मविआ’मध्ये आमदारांची घुसमट होत होती

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येऊन वीर सावरकरांचे दर्शन घेतल्यानंतर, हिंदुस्थान पोस्टशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतल्यानंतर मला खूप समाधान मिळाले. हिंदुत्वाचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी अभिवादन केले. आमचे सरकार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच स्थापन झाले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आमच्या आमदारांची  घुसमट होत होती. हिंदुत्व आणि वीर सावरकरांचे विचार बोलताही येत नव्हते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे, म्हणून आज या ठिकाणी मी वीर सावरकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आलो आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सुडाच्या भावनेने काहीही केले जाणार नाही

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी सरकार कधी पाठवणार यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्याला अजून वेळ आहे. आता स्थापन झालेलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वात आधी राज्यातील विकासाच्या मुद्द्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. शेतक-यांचे प्रश्न या सरकारकडून सोडवण्याचे प्रयत्न आधी केले जाणार आहेत. राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येकाला हे सरकार आपलं आहे, असं वाटायला हवं त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शिवसेनेच्या ज्या १४ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, सूडभावनेने काहीही केले जाणार नाही, नियमानुसार ज्या गोष्टी असतील त्या केल्या जातील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here