रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी शासनाकडून ‘मिशन’ राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रविवारी केले.
कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे ‘माविम’ व ‘कारितास इंडिया’ यांच्या सहकार्याने आयोजित प्राकृतिक कृषी, मिलेट्स व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘रासायनिक खतांच्या अतिरेकी वापराने जमिनीची हानी झाली व मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम झाला. भरडधान्यासारख्या पारंपरिक आहाराऐवजी ग्लूटेनयुक्त पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले. जीवनशैलीत बदल झाले. आहार व जीवनशैलीतील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊन देशातील मधुमेह व कर्करोगाच्या रूग्णांची संख्या वाढली. त्यामुळे पुन्हा मिलेट्स आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज भासू लागली आहे.’
‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सुचविल्यानुसार पौष्टिक तृणधान्य वर्ष यंदा सर्व जगात साजरे होत आहे. हे मिलेट्स वर्ष महत्वाचे ठरून भविष्यात श्रीअन्नाला ग्लॅमर व बाजारपेठ मिळून जगभरातून मागणी वाढणार आहे. त्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे कोठार म्हणून महाराष्ट्र व भारत अव्वल ठरणार आहेत. नैसर्गिक शेतीमुळे गुंतवणूक खर्च कमी होतो व जमीनीचा कस कायम राहून उत्पादकताही वाढते. त्यामुळे महाराष्ट्राला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी याबाबत मिशन राबविण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी व बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हाती असावी यासाठी ॲग्रो बिझनेस कम्युनिटी उपक्रम राबविण्यात येईल. शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच, ट्रॅक्टर आदी साधने मिळून विकासात भर पडली. सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना भरपाई देण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला. त्यासाठी सततच्या पावसाची व्याख्या करण्यात आली. त्यामुळे बहुसंख्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ३७ लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही महत्वाची योजनाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नांदगावपेठेत वस्त्रोद्योग पार्क सुरू करण्यात आला. आता केंद्र शासनाच्या ‘मित्रा’ योजनेतील टेक्स्टाईल पार्कही अमरावतीत आणण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले.
वऱ्हाडी खाद्यसंस्कृती महोत्सव पुणे-मुंबईत भरविणार
महोत्सवात महिलाभगिनींनी स्टॉलद्वारे विविध वस्तू, पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई व पुणे येथेही व-हाडी खाद्यसंस्कृती महोत्सव भरवून तिथे येथील बचत गटांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावतीत बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी मॉल निर्माण व्हावा व फिरत्या पद्धतीने गटांना तो उपलब्ध करून द्यावा. राज्य शासन त्यासाठी निश्चित सहकार्य करेल, अशीही सूचना त्यांनी केली.
विषमुक्त शेतीला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्राकृतिक शेतीबाबत विविध कक्षांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मदतीचे प्रमाण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढवून दिले आहे. त्याचा लाभ आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना होत आहे, असे खासदार डॉ. बोंडे यांनी सांगितले.
विविध स्टॉलची पाहणी
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महोत्सवात सहभागी विविध स्टॉलची पाहणी करून तेथील महिलाभगिनी, शेतकरी, युवकांशी संवाद साधला. त्यांच्याकडील उत्पादनांची माहिती जाणून घेत त्यांना प्रोत्साहन दिले.
(हेही वाचा – भाजपमध्ये आलेल्या कोणाची चौकशी बंद झाली ते दाखवा – देवेंद्र फडणवीस)
Join Our WhatsApp Community