शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवसेनेकडून झाली मोठी चूक

हिंदुत्वाचा मुखवटा घातलेले उसनवार शिवसैनिक बनवल्याने त्यांच्यात अस्सल हिंदुत्वाचा डीएनए येणार कुठून?

146

सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक राजकीय पक्षांनी मोठ-मोठे बॅनर लावत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पण शिवसेनेकडून डोंबिवली शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवाजी महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांचे फोटो लावण्यात आले होते. यावरुन आता भाजपने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेची ही फार मोठी चूक असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे.

शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना शिवसेनेकडून झालेली ही फार मोठी चूक असून, शिवसेना आता हिंदुत्वाचा डीएनए विसरला असल्याची बोचरी टीका, भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

(हेही वाचाः ‘ती’ चूक होती! ठाकरे सरकारच्या निर्णयाबाबत राऊतांचे मोठे विधान)

आता तरी डोळे उघडणार का?

शिवसेनेच्या सर्व उच्च पदांवर असलेल्या मंडळींचा पिंड हा मुळात शिवसेनेचा नाही. ही सर्व मंडळी दुस-या पक्षांतून उसनवार घेतलेली आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचा मुखवटा घातलेले उसनवार शिवसैनिक बनवल्याने त्यांच्यात अस्सल हिंदुत्वाचा डीएनए येणार कुठून, असा सवाल त्यांनी केला आहे. जर का एखादा खरा शिवसैनिक डोंबिवलीतील शिवसेना शहरप्रमुखाच्या महत्वाच्या पदावर असता तर ही चूक घडली नसती. या बॅनरवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचेही नाव असून, आता तरी त्यांचे डोळे उघडतात की नाही हे पाहण्याची गरज आहे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः बहुतांश मजूर संस्थांवर अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे, कारवाई माझ्यावरच का? दरेकरांचा सवाल)

शिवसेनेचे म्हणणे काय?

या चुकीबाबत शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. डोंबिवलीतील काही बॅनर्सवर चुकून छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला असून, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे. पण भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नये. शहरप्रमुखपदी कोणाला बसवायचे हा सर्वस्वी आमच्या पक्षाचा प्रश्न आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. शिवसेनेकडून शिवजयंतीनिमित्त न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक डोंबिवलीत काढण्यात आली. ती पाहून भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असावी, अशी खोचक टीकाही यावेळी त्यांनी भाजपवर केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.