भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयातच घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. विरोधकांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करणा-या सोमय्यांच्याच ऑफिसमध्ये घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयात श्रवण यंत्राचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कार्यालयातील दोन कर्मचा-यांनी संगनमताने ‘ऐका स्वाभिमानाने’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येणा-या श्रवणयंत्र वाटपातील जवळपास साडेसात लाखांच्या मशीनचा परस्पर अपहार केला आहे. ही बाब कार्यालय प्रमुखांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, नवघर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सोमय्या यांच्या निर्मलनगर, मुलूंड पूर्व कार्यालयाचे प्रमुख प्रफुल्ल कदम यांच्या तक्रारीवरुन नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार कदम हे 2017 पासून सोमय्या यांचे कार्यालयातील कामकाज पाहतात.
संशय आल्याने चौकशी केली आणि घोटाळा उघड झाला
2017-2018 पासून संस्थेमार्फत ऐका स्वाभिमानाने या उपक्रमांतर्गत कानाचे मशीन 500 रुपये दराने ज्येष्ठ नागरिकांना दिले जातात. कॅम्पचे आयोजन करुन मशीनचे वाटप होते. कार्यालयातील प्रज्ञा जयंत गायकवाड (37) आणि श्रीकांत रमेश गावित (36) यांची प्रकल्पप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. गायकवाड आणि गावित त्याचा हिशोब कदम यांना देतात. मिळालेली रक्कम बॅंकेत जमा केली जाते.
( हेही वाचा: संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर; दोन जण ताब्यात )
काही दिवसांपूर्वी कदम यांनी प्रज्ञा यांच्याकडे किती मशीन शिल्ल्क आहे? याबाबत विचारले. त्यांनी सर्व मशीनचे वाटप झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली. तेव्हा 1 हजार 472 मशीनची जवळपास 7 लाख 36 रुपयांची तफावत आढळली. दोघांकडे जाब विचारताच त्यांनी अपहार केल्याची कबुली दिली आहे.
Join Our WhatsApp Community