– सुनील घनवट
‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेनं निवडणूक प्रचारात मोठी भूमिका बजावली. हा नारा हिंदूंच्या (Hindu) एकजुटीची जाणीव करून देणारा ठरला. हा नारा केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिला नाही; तर त्याने साऱ्या हिंदूंना संघटित करण्याचे काम केले. या घोषणेनं समाजातील विविध घटकांमध्ये चर्चेचं वादळ निर्माण केलं, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हिंदू मतदारांनी या नाऱ्याला सकारात्मक आणि प्रचंड प्रतिसाद देत आपली एकजूट दाखवून दिली. याबरोबरच हिंदूंसाठी सरकारने कार्य करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे हे यातून दाखवून दिले.
हिंदू समाजाची भूमिका
गेल्या काही दशकांपासून हिंदूंना (Hindu) त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गरजा दुर्लक्षित केल्या जात असून ही भावना वाढीस लागली होती. अनेक दशकांपासून अल्पसंख्याक धोरणे आणि तुष्टीकरणाच्या नावाखाली हिंदूंना दुय्यम स्थान दिले जात होते. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने या भावनांना वाचा फोडली. मतं फोडण्याच्या किंवा समाजात फूट पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना बळी न पडता हिंदूंनी एकत्र येऊन मतदान केलं. या प्रक्रियेत हिंदूंनी हे स्पष्ट केले आहे की, आता त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रश्नांना प्राधान्य दिले जावे.
सरकारची जबाबदारी आणि आश्वासनांची पूर्तता!
हिंदूंसमोर (Hindu) आज अनेक समस्या आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढील मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
(हेही वाचा Uttar Pradesh येथील गंगा नदीच्या रसुलाबाद घाटाचे नाव बदलून केले चंद्रशेखर आझाद घाट)
धर्मांतरण विरोधात कायदा
गरीब, आदिवासी यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात धर्मांतरण केले जाते. तसेच लव्ह जिहादला बळी पडून शेकडो तरुणींच्या आयुष्याची वाताहत होत आहे. हे थांबवण्यासाठी धर्मांतरण विरोधी आणि लव्ह जिहाद कायदा जलद गतीने व्हावा.
हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण
अनेक दशकांपासून हिंदूंच्या (Hindu) ऐतिहासिक मंदिरांवर इतर धर्मियांनी हल्ले करून ती बळकावली आहेत, काही ठिकाणी सरकारी हस्तक्षेपही झाले आहेत. यासाठी ती ठिकाणे पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. विशेषतः काशी, मथुरा आणि नुकत्याच समोर आलेल्या संभल यांसारख्या ठिकाणी हिंदूंच्या धार्मिक भावना जोपासणे आवश्यक आहे. आज हिंदूंच्या सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण झालेले असून त्यांची संपत्ती लुटली जात आहे. हे सर्व थांबले पाहिजे.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन
देशभरातील अनेक हिंदू (Hindu) राजांनी विदेशी आक्रमकांना कित्येक वेळा या भूमीवरून पळवून लावले आहे. त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे गड – किल्ले, राजवाडे, विजयनगर सारखी साम्राज्ये यांचे रक्षण आणि जोपासना करण्याच्या कार्याला गती द्यायला हवी.
शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा
हिंदू संस्कृतीचा गौरवशाली इतिहास, वेद-उपनिषदे, तत्वज्ञान आणि इतर परंपरा यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नव्या पिढीला त्यांच्या प्राचीन समृद्ध वारशाची ओळख होऊन स्वाभिमान निर्माण होईल.
आर्थिक आणि सामाजिक प्रगती
केवळ धार्मिक नव्हे, तर आर्थिक प्रगतीतही हिंदूंना (Hindu) प्रोत्साहन द्यायला हवे. यासाठी शेती, लघुउद्योग आणि शिक्षण क्षेत्रात विशेष योजना कार्यान्वित करायला हव्यात.
(हेही वाचा Baba Adhav यांचा बोलविता धनी कोण?)
कौटुंबिक कायद्यांमध्ये समता
समान नागरी कायदा लागू करणे ही काळाची गरज असून यामुळे हिंदूंवर लादलेल्या अन्यायकारक कायद्यांचा भार कमी होईल आणि समाजात समानतेचा आदर्श प्रस्थापित होईल.
हिंदू समाजाला संदेश
निवडणुकीनंतरही हिंदू (Hindu) समाजाने दीर्घकालीन हितासाठी आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांच्या आधारावर एकजुट ठेवत स्वतःचा विकास करणे आवश्यक आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा केवळ मतांसाठी न राहता ती एक दीर्घकालीन चळवळ झाली पाहिजे. आता या मतांमागील आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. सरकारने हिंदू समाजाच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा विश्वास सार्थ ठरवणे ही काळाची गरज आहे. धर्म, संस्कृती आणि सामाजिक न्याय यामध्ये संतुलन साधत, हिंदू समाजासाठी सरकारने आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावली तरच हा नारा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. तीच खरी यशस्वी लोकशाहीची खूण असेल.
(लेखक हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक आहेत.)
Join Our WhatsApp Community