महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्व राजकीय पक्ष ऍक्टिव्ह झाले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे. निवडणुकीत अनेक पक्षांचे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यामुळे ज्या इच्छूकांना संधी मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत, ते पर्याय शोधत आहेत. वसई-विरार येथे बहुजन विकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. राजीव पाटील हे हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बविआच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी महायुतीचा पाठिंबा काढून तो महाविकास आघाडीला दिला आहे.
(हेही वाचा सीमेपलीकडील दहशतवाद आणि फुटीरतावादाचा अडथळा; S. Jaishankar यांचे पाकिस्तानच्या भूमीवरून खडेबोल)
गेल्या २५ वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या १० वर्षांत हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी महायुतीला साथ दिली. मात्र, आता हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांचे आतेभाऊ आणि बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. राजीव पाटील यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित असून ते नालासोपाऱ्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी राजीव पाटील हे पक्षात दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात. राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या. राजीव पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. याच कारणावरून भाजपा आणि पर्यायाने महायुतीला शह देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी नवी खेळी केली आहे. बविआला पाठिंबा दिल्यास हितेंद्र ठाकूर मविआचे तीन उमदेवार निवडून आणू शकतात, अशी चर्चाही सुरू आहे.
Join Our WhatsApp Community