अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेसंदर्भातील कॅग अहवाल सादर केला. मुंबई महापालिकेतील कारभारात पारदर्शकता नसून १२ हजार कोटींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालातून काढण्यात आला. तसेच महापालिकेतील या भ्रष्टाचाराची योग्य यंत्रणेकडून चौकशीचा विचार केला जाईल, असे फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान दिले आहे.
आदित्य ठाकरेंचे काय आव्हान?
आदित्य ठाकरे म्हणाले की, हिंमत असेल तर नाशिक, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांची देखील कॅग चौकशी करावी. पण त्यांच्यात हिंमत नाही आणि लाजही नाही. हे सगळे राजकीय आहे. बदनामीकरण सुरू आहे. मुंबई शहराला बदनाम करायचे. मुंबई महानगरपालिकेला संपवून टाकण्याचा हा प्रयत्न आहे.
दरम्यान कॅगच्या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. त्यातून निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे. विशेष करून कोरोनाकाळात केलेल्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. ‘कॅगचा हा अहवाल ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे’, असा इशाराही यावेळी फडणवीस यांनी दिला.
(हेही वाचा – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले; १७ जुलैला पावसाळी अधिवेशन)
Join Our WhatsApp Community