मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा पक्ष उभारणीसाठी शिवसैनिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी हालचालींना सुरुवात झाली असून आदित्य ठाकरे हे सध्या राज्याचा दौरा करत आहेत. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे हे देखील राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
तेजस ठाकरे यांची राजकारणात एंट्री होणार असल्याचे माध्यमांमधील बातम्यांमधून समोर येत आहे. पण या चर्चांवर कोणीही विश्वास ठेऊ नका. कोणीतरी अफवा पसरवतं आणि याच अफवेला पुढे नेलं जातं. हे चुकीचं आहे. तेजस ठाकरेंना राजकारणात यायचं असेल तर त्याबाबत तो सांगेल, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः ‘या’ जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का)
…म्हणून चर्चांना सुरुवात
मागील काही महिन्यांपासून तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाची चर्चा जोरात रंगू लागली आहे. युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तेजस ठाकरेंचे राजकारणातील पदार्पण लवकरच होईल, असे मागील वर्षी सांगितले. त्यानंतर तेजस ठाकरे सातत्याने रश्मी ठाकरेंसोबत राजकीय सभांना हजेरी लावताना दिसत आहेत. तसेच खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर दिलेल्या जागता पहाऱ्याच्यावेळी तेजस ठाकरेही तिथे हजेरी लावून गेले होते. त्यामुळेच तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community