शिवसेनेच्या निष्ठा यात्रेत निष्ठावंताना डावलले जाते तेव्हा…

133

युवा सेना अध्यक्ष आणि शिवसेना आदित्य ठाकरे हे मुलुंड,भांडुपमध्ये निष्ठा यात्रा काढत शिवसैनिकांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु या निष्ठा यात्रेतच निष्ठावान शिवसैनिकांना डावलले जात असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकाबाजुला शिवसेनेला घरघर लागलेली असताना दुसरीकडे न ष्ठावान शिवसैनिक हे शिवसेनेच्या पाठिंशी ठामपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आजही शिवसेना नेत्यांकडून निष्ठावान शिवसैनिकांना पक्षाच्या नेत्यांकडून डावलले जात असल्याची सल आत खऱ्या अर्थाने निष्ठावंताना जाणवू लागली आहे.

( हेही वाचा : कुलाब्यातील इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या; राहुल नार्वेकर यांचे निर्देश )

शिवसेनेतून आमदार व खासदारांसह अनेक पदाधिकारी फुटून एकनाथ शिंदे यांचा समर्थक स्वतंत्र गट स्थापन झाल्याने शिवसेनेत अस्थिरता पसरली आहे. शिवसेनेतील या बंडाळीमुळे एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार करत त्यांना आपले समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, विभागप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार, खासदार आणि नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. एका बाजूला सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना जवळ केले जात असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील काही विभागप्रमुख व इतर पदाधिकारी आजही मनाने एकत्र येताना दिसत नाही.

मुलुंड व भांडुपमध्ये निष्ठा यात्रा

मंगळवारी युवा सेना अध्यक्ष व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुलुंड व भांडुपमध्ये निष्ठा यात्रा काढली. या निष्ठा यात्रेला आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. परंतु भांडपमधील शाखांना भेटी देताना त्यांनी माजी आमदार अशोक पाटील आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिकांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाजुल ठेवले होते. एकाबाजूला निष्ठावान शिवसैनिकांना जवळ केले जात असताना भांडुपमध्ये माजी आमदार अशोक पाटील यांची कुठेही विचारपूस आदित्य ठाकरे यांनी केली नाही किंबहुना तेथील बॅनरवर त्यांचे नावही झळकू न देण्याची खबरदारी स्थानिक आमदार व विभागप्रमुखांनी घेतल्याचे दिसते.

भांडुपमध्ये अनेक वर्षे नगरसेवक असलेले अशोक पाटील हे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मनोज कोटक यांचा पराभव करून विजयी झाले. युती नसताना भाजपला टक्कर देत ते विजयी झाले. परंतु २०१९ च्या निवडणुकीत युतीच्या वेळील पाटील यांचा पत्ता कापून नगरसेवक असलेले विभाप्रमुख आमदार रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. कोरगावकर हे आमदार बनल्यानंतरही पाटील हे शिवसेनेतच राहिले. परंतु शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचे गट फुटल्यानंतर पाटील यांनी आपल्या समर्थकांसह पक्षप्रमुखांची भेट घेण्याची तयारीही दर्शवली. परंतु उध्दव ठाकरेंनी अद्यापही भेट दिली नाही. परंतु आदित्य ठाकरेंच्या भांडुप भेटीतही पाटील यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे पाटील यांनी जाहीरपणे प्रसारमाध्यमांपुढे याची कबुली देत तीव्र नाराजी व्यक्त केली.

छगन भुजबळ, नारायण राणे हे फुटल्यानंतर आपल्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. आपल्यावर आजही गुन्हे असून परदेशात जाण्याचा पासपोर्टही मिळू शकत नाही. पक्षासाठी आजही आम्ही निष्ठावंत असूनही पक्ष अडचणीत असतानाही जर आम्हाला विचारले जात नसेल तर काय म्हणावे अशीही खंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.