कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रूपये!; ‘नाणार’बाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?

98

कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठा वाव आहे. येथील निसर्ग खूप सुंदर आहे. पर्यटन वाढीसाठी शासन कटिबध्द आहे, असे सांगताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी या साठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा पर्यटन मंत्र्यांनी केली. प्रादेशिक पर्यटन योजनेतून पूर्ण झालेल्या कुणकेश्वर मंदिरामागील रस्त्याचे खडीकरण, मंदिरा जवळील पायऱ्यांचे बांधकाम, प्रवेशद्वाराचे बांधकाम, मंदिराची संरक्षक भिंत, समुद्र किनाऱ्यावरील प्रेक्षक गॅलरी बांधकाम व मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक या कामांचे लोकार्पणही आज करण्यात आले.

‘नाणार’बाबत आदित्य ठाकरेंचे विधान

कोकण दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांना नाणार प्रकल्पाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी आधीपण सांगितले आहे की, नाणार प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरीत करायचा हा विषय आहे. नाणार जाणार असं आपण त्यावेळीच बोललो होतो. पण तो दुसरीकडे कुठे न्यायचा तर तो लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी लोकांना सोबत घेऊन, लोकांशी चर्चा करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल ह्यावर विचार करूनच पुढची पावले उचलली जातील, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.  त्याबरोबरच नवीन प्रकल्पांची उभारणी करतानाही स्थानिकांना विचारात घेतले जाईल, असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले. जिथे जिथे कुठेही काही नवीन करायचे असेल मग तो हायवे असेल वा रस्ते असतील किंवा कुठला मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार, असेही पुढे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली बनणार चार समित्या? )

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सरपंच चंद्रकांत घाडी, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लबधे आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.