आदित्य ठाकरेंचे पदपथांच्या सुशोभिकरणासाठी ‘पर्यटन’

103

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेतील मंजूर विकासकामांचे श्रीफळ वाढवायला सुरुवात झाले असून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रायोगिक तत्वावर हाती घेतलेल्या पदपथांच्या सुशोभिकरणाच्या कामांसाठी वडाळा आणि चेंबूर या दोन् ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी पर्यटन केले.

प्रायोगिक तत्त्वावरावरील प्रकल्पांचे भूमिपूजन

मुंबईतील पदपथांची सुधारणा आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतलेल्या चार पैकी वडाळा आणि चेंबूर या दोन ठिकाणच्या प्रकल्पांचे भूमिपूजन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. पादचा-यांना चालण्यासाठी सुलभतेला आणि त्यांच्या सुरक्षिततेला लक्षात ठेवून नवीन पदपथ संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. प्रारंभी चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. यामध्ये एफ/उत्तर विभागात लेडी जहांगीर रस्त्यावरील पदपथ (रुईया महाविद्यालय ते वडाळा रेल्वे स्थानक), एम/पश्चिम विभागातील चेंबूरमध्ये दयानंद सरस्वती मार्ग ते डायमंड गार्डन पर्यंत, एच/ पूर्व विभागातील वांद्रे (पूर्व) मध्ये अली यावर जंग मार्ग आणि एस. डी. मंदिर मार्ग, पी/दक्षिण विभागातील गोरेगाव मध्ये एम. जी. मार्ग या ठिकाणी नावीन्यपूर्ण पदपथ बांधले जाणार आहेत. यापैकी चेंबूर आणि वडाळा येथील पदपथ सुशोभीकरणाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

४० ते ५० वर्ष पदपथ टिकतील

या नवीन पदपथांची संकल्पना ही मुंबईतील पादचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या आधुनिक पदपथांवर चालण्याची क्षमता वाढीस लागणार असल्याने नागरिकांना सुखकर अनुभव येईल. पदपथांची भौतिक स्थिती सुधारून, पदपथांसह रस्त्यांचे सौंदर्यही वाढेल. पदपथ आणि नागरी विकासाच्या आधुनिक संकल्पना व मार्गदर्शक तत्त्वांचा यामध्ये समावेश करून अंमलबजावणी केली जाणार आहे. सुमारे ४० ते ५० वर्ष टिकतील आणि कमीत कमी खर्चामध्ये परिरक्षण करावे लागेल, अशा पद्धतीचे हे पदपथ राहणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

New Project 40

काय असणार या पदपथांवर?

पदपथांचा पृष्ठभाग समतल राखणे, रस्ता ओलांडणे सुलभ होणे, प्रमाणबद्ध आणि सर्वसमावेशक असे सूचना फलक लावून पादचा-यांना योग्य मार्गदर्शन करणे, विद्यमान पथदिव्यांमध्ये आधुनिकता आणून पदपथांचे सौंदर्य वाढवणे, आधुनिक पद्धतीने बनवलेले बाक, कचरापेटी, फुलझाडे इत्यादी लावणे, पदपथावरील वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सभोवताली वृक्ष संरक्षण उपाययोजना करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सुशोभीकरणाला अनुरूप असे प्रभावी आणि आधुनिक बस थांबे उभारणे या सर्व बाबींचा या कामांमध्ये समावेश आहे. या प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे पंधरा महिने इतका आहे. टप्प्या-टप्प्याने हे काम हाती घेतले जाणार आहे, जेणेकरून संबंधित परिसरातील पादचा-यांना आणि रहिवाशांना कोणतीही अडचण होणार नाही.

(हेही वाचा मुंबै बँक निवडणूक: सर्वच म्हणतात ‘हम साथ साथ है’)

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश फातर्पेकर, आमदार तुकाराम काते, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, नगरसेवक अमेय घोले, उप आयुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे, उप आयुक्त (परिमंडळ ५) विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर, एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, रस्ते विभागाचे इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मंत्रीपदाचा दर्जा कमी करू नका! – नेहल शाह

मी आजवर कधीही एखादा मंत्री पदपथाच्या कामाचे भूमीपुजन करायला आले आहेत, असे पाहिलेले नाही. वडाळा ते रुईया कॉलेजपर्यंतच्या ज्या भागाच्या पदपथाचे सुशोभिकरण केले जात आहे, त्यातील एक पदपथ शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांच्या प्रभागात एक पदपथ माझ्या प्रभागात येत आहे. परंतु या पदपथाच्या कामाचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणू्न शिवसेना नगरसेवक असलेल्या पदपथाच्या जागेवर घेण्यात आले. एका पदपथाच्या कामासाठी पर्यावरण मंत्री यांना रस्त्यावर फिरावे लागते. हे योग्य नसून अशाप्रकारे पदपथाचे भूमीपुजन मंत्र्यांच्या हस्ते करून त्यांच्या मंत्रीपदाचा दर्जा कमी करू नका, असे भाजपचे स्थानिक नगरसेविका नेहल शाह म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.