वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास: आदित्य ठाकरेंनी ‘यांना’ म्हटले समाजकंटक

191

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना संक्रमण शिबीरात सदनिका अथवा बाहेर राहिल्यास मासिक २५ हजार भाडे दिले जात आहे. मात्र, याबाबत रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून या तक्रारी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ऐकून घेतल्या जात आहेत. तसेच येत्या रविवारी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रहिवाशांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. परंतु मनसेच्या या वाढत्या हस्तक्षेपानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरळीतील स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी जनतेला पत्र लिहिले असून यामध्ये त्यांनी मनसेला अप्रत्यक्ष समाजकंटक म्हणून संबोधले आहे. स्वतःची घरे भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी या निवेदनात असे म्हटले आहे की, वरळी बी.डी.डी. पुनर्विकास आराखडा रहिवाशांना माहितीकरीता पाहिजे असल्यास म्हाडा कार्यालयात उपलब्ध असून, जर आपणांस आवश्यक वाटल्यास सामूहिक सादरीकरण म्हाडाच्या वतीने देखील करण्यात येईल. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही शंका असल्यास त्यासाठी म्हाडा स्वतः सामुहिक बैठकांचे आयोजन करून आपल्या शंकेचे निरासन करेल आणि यासाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.

नियोजनानुसार नागरिकांना केवळ ३ वर्षामध्ये डोळ्यादेखत नवीन घर मिळणार आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी रहिवाशानाच संक्रमण शिबीर अथवा बाहेर २५,००० मासिक भाडे घेऊन रहावे लागणार आहे. हे मासिक घरभाडे देण्याची जबाबदारी म्हाडाची असेल. तर बाकीच्या रहिवाशांना बाहेर राहण्याची गरज नसून थेट नवीन घरामध्ये जाता येणार आहे.

माजी मुख्यमंत्री, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याच पुढाकारातून पूर्णत्वास नेले आहे. निवृत्त पोलिसांना सध्या आकारण्यात येणाऱ्या मासिक घरभाडे विषयीदेखील आपण विधीमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले असून लवकरच त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे व आपण यासाठी प्रयत्नशील आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला वरळी बी.डी.डी. प्रकल्प बनवणारे टाटा प्रोजेक्टस् ही कंपनी केवळ विकासक अथवा कंत्राटदार म्हणून नाही तर ती एक सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. गेली २५ वर्षे आपण, या पुनर्विकास प्रकल्पाची वाट पाहत आहात, त्यामध्ये स्वतःची घरे भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत,असे म्हटले आहे. त्यांनी पुढे खंत व्यक्त करत असे म्हटले आहे की, जर हा प्रकल्प अपूर्ण राहिला तर वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सामान्य मराठी माणसांचे मुंबईमधील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि याचे पूर्ण पाप त्याच समाजकंटकांवर असेल. त्यामुळे एकप्रकारे अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांनी मनसेला समाजकंटक म्हणून संबोधले असून यामुळे हा प्रकल्प रखडल्यास याचे पापही अप्रत्यक्ष मनसेवर टाकण्याचाही इशारा दिला आहे.

(हेही वाचा – शिवसेना बांधणीत पालकमंत्री दीपक केसरकर पडतात कमी: केसरकर यांच्यापेक्षा लोढा ठरतात सरस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.