आदित्य आणि राहुल; दोन युवराज, इतिहास एकच…

99

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात पोहोचली आहे. हिमाचल आणि गुजरातमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु असताना कॉंग्रेसचे युवराज मात्र आपल्याच मस्तीत आहेत. आता शिउबाठाचे युवराज आदित्य ठाकरे देखील या यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी झाले आहेत. त्या दोघांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले. चाय बिस्कुट पत्रकारांना लोकांना त्यांच्यात भारताचं भविष्य दिसतंय.

( हेही वाचा : पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ? मुलांचे कुतूहल, अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे)

राष्ट्रवादी कॉंग्रेसने या यात्रेचे समर्थन केल्यानंतर आदित्य ठाकरे नांदेड-हिंगोली सीमा ते भाडेगावपर्यंत जवळजवळ ७ किलोमीटर चालले. मुळात ही यात्रा म्हणजे कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी ही यात्रा काढली जात नाही तर राहुल गांधी परत एकदा प्रमोट करण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

कारण कॉंग्रेसला जर वाचवायचं असेल तर गांधी कुटुंबाला पक्षातून काढलं पाहिजे. मल्लिकार्जून खर्गे अध्यक्ष झाल्यानंतरही कॉंग्रेसची प्राथमिकता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे. राहुल गांधी हे पराभूत नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा अक्षरशः चोथा झालेला आहे. तिच गत ठाकरे गटाची. हा ठाकरे गट महाराष्ट्रातील म्हणजे शिवसेना नावाचा एक महत्वाचा पक्ष होता. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलं आणि आपल्या सुपुत्राला मंत्री बनवायचं व पुढचा मुख्यमंत्री बनवायचं स्वप्न पडलं आणि त्यांची शिवसेना फुटली.

शिवसेनेतील हे सर्वात मोठं बंड मानलं जातं. कारण आतापर्यंत राज ठाकरे यांनी मोठं बंड करुनही पक्षाला फारशी हानी झाली नव्हती. एकनाथ शिंदे यांनी मुळावरच घाव घातला आणि खरी शिवसेना कोणाची, बाळासाहेबांचा खरा वारसा कोण चालवतो हा मूळ प्रश्न उभा राहिला. याचं महत्वाचं कारण काही आमदारांनी सांगितलं, विशेषतः शिवाजी बापू पाटील यांनी तर आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं.

त्यांचं म्हणणं असं की बाळासाहेब ज्येष्ठ होते म्हणून त्यांना नमस्कार करायला कोणाचीच हरकत नव्हती, उद्धव ठाकरेंना देखील ते हा मान द्यायला तयार होते. पण आदित्य ठाकरे हे अनेक शिवसेना नेत्यांसमोर लहानाचे मोठे झाले. त्यांना अतिरिक्त सन्मान कोण देणार? आणि का द्यावा? परंतु ठाकरेंची इच्छा अशी होती की आदित्य यांना तो सन्मान मिळायला हवा आणि त्यातून अनेक वाद निर्माण झाले.

युवराज असण्याची हीच समस्या आहे की आपलं कर्तृत्व नसताना लोकांनी आपल्याला प्रणाम केला पाहिजे. पूर्वी राजाचा मुलगा राजा व्हायचा, आता लोकशाही आहे. आता जो कर्तृत्ववान आहे तोच राजा होतो. आणि या युवराजांना सगळ आयतं हवं आहे. हे दोन युवराज एकाच यात्रेत एकत्र सहभागी झाले. चाय बिस्कुटांना यात भारताचं भविष्य दिसलं आणि मला त्यांच्या पक्षाच्या र्‍हासाचं कारण दिसलं. या दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.