खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईची शांती भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण मुंबई पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावला असून आम आदमी पार्टीने मागणी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असल्याचा दावा आम आदमी पार्टी –‘आप’ने केला आहे. आपच्या कार्यकारणी सदस्या प्रिती शर्मा-मेनन यांनी हे सांगितले आहे. राणा प्रकरणात आम आदमी पक्षाने अप्रत्यक्ष शिवसेनेचे समर्थन केल्याचे पहायला मिळत आहे.
आपचा निषेध
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगितले. राणा दाम्पत्यांना धार्मिक बाबींमध्ये रस नसून राजकारण करून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. राणा दाम्पत्यांनी मुंबईची शांती भंग करण्याचा प्रयत्न केला असून, ही महाराष्ट्रातील राजकारणात न शोभणारी बाब आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध असल्याचे प्रिती शर्मा-मेनन यांनी यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः नायगाव, परेल व्हिलेज, काळेवाडी परिसराच्या पाण्याच्या सुधारणेत ही मात्रा पडली लागू)
राणा दाम्पत्यावर टीका
मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करणार होतात मग काय झालं त्याचं, असा प्रश्न उपस्थित करत प्रिती शर्मा-मेनन यांनी मुंबईत येऊन शांती भंग केली. शिवसेनेचा हंगाम पाहून राणा दाम्पत्यांना हनुमान चालासाचा विसर पडला का? की घाबरून आपल्या घरी पळ काढला? अशी खोचक टीका त्यांनी त्यावेळी केली.
(हेही वाचाः माफीनाम्यावर शिवसैनिक कायम, पोलिस ठाण्यावरही केली गर्दी)
भविष्यात काय होणार?
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘आप’ने आतापासून फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, पंजाब नंतर मुंबई काबीज करण्यासाठी संपूर्ण मुंबईभर वातावरण निर्मिती करणाऱ्या आम आदमी पार्टीला महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेशीच टक्कर द्यावी लागणार आहे. ‘आप’ने भाजपवर टीका केली असली तरी मुंबईत २५ वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेवर टीका केल्याशिवाय निवडणूक लढवता येणार नाही. परंतु आज भाजपवर टीका करताना शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या ‘आप’ला भविष्यात शिवसेनेविरोधात टीका करताना पहायला मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community