मुंबईत हा पक्ष म्हणतोय ‘आप’लं म्हणा!

87

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मुस्लिम धर्मियांनाही जवळ करताना हनुमान चालिसाचे पठण ऑनलाइनद्वारे करत शिवसेना, भाजप आणि मनसेच्या राजकीय भांडणात उडी मारून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आधी इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या ‘आप’ने ऑनलाइन हनुमान चालिसाचे पठण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून आम्हालाही ‘आप’लेसे म्हणा असे सांगण्यास सुरुवात केली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘आप’कडून हज हाऊस येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

आम आदमी पार्टीने रमजान महिन्याच्या निमित्ताने मुंबई येथील हज हाऊस येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. इफ्तार पार्टीचे आयोजन माननीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री इम्रान हुसैन यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मुस्लिम समाजातील प्रमुख सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा – मेनन तसेच आम आदमी पार्टी मुंबई सह-संयोजक किशोर मंधियान उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना मंत्री इम्रान हुसैन म्हणाले की, ‘आप’ मुंबईच्या वतीने मुंबईतील रहिवाशांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे हा सन्मान होता. हा पवित्र महिना मुंबईकरांसाठी अनेक आशीर्वाद घेऊन येवो. दिल्लीप्रमाणेच मुंबई महानगरपालिका निवडणूकीतही ‘आप’ ला बहुमत मिळो असे मत त्यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा – लतादीदी यांचे बंधू ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल)

ट्विटरच्या माध्यमातून चालिसा पठणाचे आयोजन

तर दोनच दिवसांपूर्वी मुंबईत आम आदमी पार्टीने ट्विटरच्या माध्यमातून हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले होते. हनुमान चालिसाचा गैरवापर करणार्‍या भाजपच्या प्रयत्नांना कंटाळून “भाऊ-बंधुत्व आणि एकतेची हनुमान चालीसा” हा उपक्रम आयोजित केला असल्याचे ‘आप’ने स्पष्ट केले. ‘आप’ ने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या उपक्रमासाठी आमंत्रित केले आहे. हनुमान चालिसाच्या पठणात सहभागी होण्याऐवजी भाजपने आपले डावपेच सुरू ठेवले. हनुमान चालिसाचा जप ‘आप’ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन, आप मुंबई कार्याध्यक्षा सुमित्रा श्रीवास्तव, आप मुंबई युवा विंग अध्यक्ष आदित्य मांजरेकर, आप मुंबई सहसचिव राज शर्मा आणि आप स्वयंसेवक यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

भाजपला शह देण्यास सुरुवात

भाजपची असुरक्षितता त्याच्या या कृत्यातून दिसून आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भगवान हनुमान आपल्या हृदयात राहतात, जसे प्रभू राम हनुमानाच्या हृदयात राहतात. ज्या व्यक्तीच्या हृदयात हनुमान आहे. तो कधीही त्याच्या नावाचा वापर करून इतरांना त्रास देणार नाही. म्हणूनच आम्ही एक अभिनव मार्ग वापरण्याचा विचार केला. राजकीय पक्षांना हनुमान चालिसाच्या खर्‍या अर्थाची आठवण करून द्यावी लागत आहे, असे मत आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय सदस्या प्रिती शर्मा – मेनन यांनी मांडले. त्यामुळे येनकेन प्रकारे चर्चेत राहण्याचा निर्धार करत ‘आप’ आपले २०२२ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवकांचे खाते उघडून भाजपला शह देण्यास सुरुवात करत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.