आता भाजपचे ‘पदरा’आडचे राजकारण! सेनेचा घणाघात

भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो, असे शिवसेनेने म्हटले.

69

भाजपकडून सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या आडून जे ‘शिखंडी’ पद्धतीचे राजकारण हे लोक करीत आहेत, त्याचा बुरखाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी फाडला. ‘‘हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या’’ असे ठाकरे आव्हान करतात तेव्हा भाजपने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर हल्ला करणे समजू शकतो, पण त्यांच्या कुटुंबाचाही छळ करून भाजपवाले स्वतःचा अमानुष चेहराच दाखवीत आहेत. ‘पदरा’आडचे नवे घाणेरडे राजकारण सुरू आहे. पडद्यामागे पूर्वी बरेच काही घडत असे. आता पडद्याऐवजी ‘पदरां’चा वापर भाजपने सुरू केला आहे. आपल्या देशात हे नवे पायंडे भाजपने पाडले आहेत, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामानाच्या संपादकीय लेरखातून करण्यात आली.

विरोधी पक्षानेच विश्वास गमावला!

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने जनतेचा विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली आहे. ‘विश्वास गमावला’ असे खरे तर एखाद्या सरकारविषयी बोलण्याची पद्धत आहे, पण महाराष्ट्रात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. येथे विरोधी पक्षाचे रोजच हसे होत आहे. विरोधी पक्ष हा चेष्टेचा विषय बनला आहे व लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. केंद्रातील भाजप धुरिणांना ‘विरोधी पक्ष’, ‘विरोधी सूर’ या संसदीय लोकशाहीच्या संकल्पनाच मान्य नाहीत, पण महाराष्ट्राला लोकशाहीची परंपरा आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांचे काम निर्भयपणे करत राहावे या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेत्यांची चांगली परंपरा आहे. भाई श्रीपाद अमृत डांगे, उद्धवराव पाटील, दत्ता पाटील, मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे, खडसे, शरद पवारसुद्धा विरोधी पक्षनेते होते. फक्त बेछूट आणि बेफाम आरोप करायचे व सरकार पाडण्याच्या तारखांचा घोळ करायचा हेच विरोधी पक्षनेत्यांचे काम नसते,  शिवसेने म्हटले आहे.

फडणवीसांची मुख्यमंत्री कसे गेले, हे त्यांना समजले नाही!

सरकारचे जेवढे आयुष्य आहे, तेवढे आयुष्य सरकारला मिळणारच आहे. सरकारच्या आयुष्याची दोरी तुमच्या हातात नाही. सरकार कधी गेले हे कळणारही नाही असे फडणवीस म्हणतात. हा त्यांचा निव्वळ अहंकार आहे. खरे तर फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच त्यांना अजून समजू शकलेले नाही. त्यामुळे फडणवीस किंवा पाटील जे बोलतात ते किती गांभीर्याने घ्यायचे? हा प्रश्नच आहे. सरकार पाडण्याच्या तारखा देणे बंद करा व कामाला लागा, असे पंकजा मुंडे यांनी दसऱ्याच्या दिवशीच भगवानगडावरून सांगितले. पंकजा बोलल्या तेच भाजपचे अंतस्थ मतप्रवाह असावेत, पण भाजपमध्ये लोकशाहीला स्थान उरले नसल्याने पक्षासाठी खस्ता खाणाऱ्यांच्या मतास किंमत उरलेली नाही, असाही टोला लागवण्यात आला आहे.

(हेही वाचा : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर विचित्र अपघात! ३ जण ठार!)

चंद्रकांत पाटलांनी कमी प्रतीचा गांजा मारला!

भाजपमध्ये उपऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे राज्य सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपचे वर्तमान कठीण आहे, भविष्यकाळ तर त्याहून कठीण आहे. 2024 नंतर देशाच्या राजकारणात बदल होतील तेव्हा ईडी, सीबीआय, एनसीबी त्यांचे ऐकणार नाहीत व त्यावेळी तोंडून फालतूची गांजाफेक केली तर भलत्याच प्रसंगाला सामोरे जावे लागेल. शरद पवार यांनी भाजपला सत्तेचा माज आला आहे, असे म्हटले. त्यांनी वैयक्तिक टीका केली नाही. पण भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा उल्लेख ‘एकेरी’ भाषेत करून आपल्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचे दाखवून दिले. राजकारणाचा हा नवा ‘पदर’ बरेच काही सांगून जातो. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात. दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही. ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.