आम आदमी पार्टीने (AAP) मुंबईतील विधानसभेच्या सर्व ३६ जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी विशेषतः उबाठा ‘टेंशन’मध्ये आले. ‘आप’ने हा निर्णय सोमवारी ५ ऑगस्टला मुंबईत जाहीर केला आणि गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत लाचारीचे प्रदर्शन केले.
मुख्यमंत्री पदासाठी याचना
एखाद्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असल्याचे दंतकथेत सांगितले जाते, तसे उबाठाचा जीव हा मुंबईत आहे, असेही बोलले जाते. महाविकास आघाडीचा भाग असूनही मुंबईतील ३६ पैकी जवळपास २५ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करण्याची तयारी उबाठाने केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन जशी मुख्यमंत्री पदासाठी याचना केली तसे अधिकाधिक जागा देण्याची मागणीही केल्याचे सांगण्यात येते.
(हेही वाचा – Waqf Board JPC : वक्फ दुरुस्ती विधेयकासाठीच्या संसदीय समितीत असणार ‘हे’ 31 सदस्य)
मित्र बदलला आणि नियमही बदलले
ठाकरे यांच्या दिल्ली वारीवर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी टिप्पणी करत उबाठाची एवढी लाचार परिस्थिती महाराष्ट्राने कधी पाहिली नाही, असा टोला हाणाला. आतापर्यंत भाजपाशी युती होती तोवर भाजपाचे राष्ट्रीय नेते मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत आणि चर्चा करीत असे. गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांनी आपला मित्र बदलला आणि नियमही. आता ठाकरे यांना काँग्रेस नेत्यांना भेटण्यासाठी दिल्ली दरबारी जावे लागते, अशी ठाकरे यांची केवेलवाणी अवस्था पूर्वी होत नसे.
मोर्चेबांधणी सुरू
काँग्रेसच्या नेत्यांना भेटता भेटता गेल्या दहा वर्षात जन्माला आलेल्या ‘आप’सारख्या पक्षनेत्यांना भेटायची वेळ ठाकरे यांच्यावर आली आहे. गुरुवारी ठाकरे यांनी ‘आप’चे (AAP) प्रमुख आणि सध्या जेलमध्ये वास्तव्य असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता आणि त्यांचे आई-वडील यांची भेट घेतली. यावेळी ‘आप’चे काही ज्येष्ठ नेतेदेखील यावेळी उपस्थित होते. ठाकरे यांनी यावेळी मुंबईत ‘आप’ने उमेदवार उभे करू नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली मात्र त्याला अद्याप यश आले नाही. ‘आप’ने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा द्यावा आणि मुंबईत ‘आप’ने उमेदवार उभे करू नये, यासाठी ठाकरे यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community