पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘इंडी’ या नावाने आघाडी बनविली आहे. मात्र, आघाडीतील घटक पक्ष कॉंग्रेसचे (Congress) महत्व कमी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘एक थी कॉंग्रेस’ अशा शब्दांत कॉंग्रेसला डिवचले आहे.
कॉंग्रेसचा अवमान करण्याची एकही संधी आप सोडत नाही
दिल्ली सरकारच्या विरोधातील अध्यादेशाच्या विरोधात सहकार्य मिळविण्यासाठी मागे—मागे धावणारा आम आदमी पक्ष आता कॉंग्रेसचा (Congress) अवमान करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही आहे. घटना चंदिगडची आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्रकारांनी विचारले की, पंजाब काँग्रेसचे नेते आपसोबत आघाडी करण्याच्या विरोधात आहेत. ही आघाडी झाली तर पंजाबमध्ये काँग्रेसचे (Congress) पानीपत झाल्याशिवाय राहणार नाही? भगवंत मान यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना कॉंग्रेसला आरसा दाखविला. ते म्हणाले की, ‘पंजाबमध्ये कॉंग्रेसची आज काय अवस्था आहे. काँग्रेस साफ झाली नाही असे म्हणायला थोडी तरी जागा उरली आहे का? दिल्ली आणि पंजाबमधील महिला आपल्या मुलांना लवकरच ‘एक थी कॉंग्रेस’ असं सांगायला सुरुवात करतील, असे मान म्हणाले.
कॉंग्रेसकडून टीका
हे ऐकून कॉंग्रेस (Congress) नेत्यांचे पित्त खवळले नसते तरच नवल! पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ट्वीटर हॅंडलवर निशाणा साधताना खेडा यांनी लिहिले आहे की, ‘आप आणि मोदी यांचे विचार अगदी सारखे आहेत. दोघेही काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, दोघेही तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही. तसे बघितले तर एका भोजपुरी चित्राचे नाव होते ‘एक था जोकर’. आपण बघितलाच असेल’. पवन खेडा यांच्या या ट्वीटनंतर कॉंग्रेस (Congress) आणि आपच्या नेत्यांमधील दरी आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 10 जानेवारीला संघटनेच्या बैठकीसाठी पंजाबला जाणार आहेत. इंडी आघाडीत कॉंग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष दिसून येत असले तरी पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांत दोन्ही पक्ष एकमेकांना संपविण्यासाठी उत्सुक आहेत.
Join Our WhatsApp Community