आम आदमी पक्षाच्या (AAP) नेत्या आणि दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांच्याविरुद्ध राउज एव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी समन्स जारी केले आहे. मानहानीच्या प्रकरणात आतिशी यांच्याविरोधात हे समन्स जारी करण्यात आले आहे. न्यायालयाने आतिशी यांना २९ जून रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याचबरोबर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत. दिल्लीतील भाजपा नेते प्रवीण शंकर कपूर यांनी अरविंद केजरीवाल आणि शिक्षण मंत्री आतिशी यांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली होती.
भाजपा नेत्याने मानहानीचा खटला दाखल केला
भाजपा आम आदमी पक्षाच्या (AAP) आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आतिशी यांनी केला होता. या विधानाविरोधात भाजपा नेत्याने मानहानीचा खटला दाखल केला होता. भाजपाचे नेते प्रवीण शंकर कपूर यांचा मानहानीचा खटला राउज एव्हेन्यू कोर्टाने स्वीकारला. या प्रकरणी आतिशी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दरम्यान, दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आधीच तुरुंगात आहेत. त्याचबरोबर उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्ली सरकारविरोधातील अनेक प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ जूनपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत. याच प्रकरणात आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह हेही जामिनावर आहेत. या प्रकरणी मनीष सिसोदिया अजूनही तुरुंगात आहेत. तसेच, सत्येंद्र जैन बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात तुरुंगात आहेत.
Join Our WhatsApp Community