कुठे चौकात ढोल ताशांचा गजर, दांडपट्टा, कुठे शिवकालीन नाण्यांचे, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, पोवाडे, तुतारी, भव्य मिरवणूका आणि ‘जय जय शिवराय’ या वीर सावरकर लिखित आरतीचा जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय…जय भवानी…जय शिवराय…अशा घोषणांमध्ये अवघी मुंबई आज दुमदुमून गेली होती. मुंबई भाजपातर्फे मुंबईत जवळपास ४१० ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शहरात या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रा, मिरवणूका, भगव्या पताका, होर्डिंग, देखावे यामुळे मुंबईत आजचा दिवस छत्रपतींंच्या जयघोषात निनादून गेला होता.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईतील २५ ठिकाणच्या जयंती उत्सवांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यामध्ये सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण दहिसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनिषा चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. चारकोप, गोरेगाव, अंधेरी पूर्व येथील उत्सवात सहभागी झाले. तर अंधेरीचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी आयोजित केलेल्या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सायन कोळीवाडा येथे आमदार तमिल सेलवन यांनी काढलेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले. आमदार प्रसाद लाड यांनी सायन येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवासह माटुंगा ओबीसी सेलतर्फे आयोजित जयंती उत्सवात सहभागी झाले. भांडूप छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे शिवपुतळ्याची आरती करण्यात आली तर मुलुंड येथे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या तर्फे शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यालाही आमदार ॲड. आशिष शेलार यांनी भेट दिली.
(हेही वाचा कोल्हापूरच्या आखाड्यातून भाजपने लोकसभेसाठी दंड थोपटले; भाजप-शिवसेना एकत्र लढणार)
कुर्ला, वांद्रे येथे शिव आरती करण्यात आली तर खार येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यासह लालबाग, काळाचौकी प्रभादेवी येथील उत्सवात ते सहभागी झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथील महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. वरळीला नाक्यावर भव्य शिव प्रतिमा उभारुन पोवाडा, लेझीम, ढोल पथकांसह ५० कलावंतांनी महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
उत्तर मुंबईत दहिसर येथे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर व्याख्यान पार पडले. खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. खा. मनोज कोटक मुलुंड पश्चिम येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कुलाबा येथे आमदार राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मुलुंड येथे आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. दहिसर येथे आमदार मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नाने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कांदिवली येथे आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव पार पडला. बोरीवलीत आमदार सुनील राणे यांनी प्रतिमा पूजन केले. चारकोप विधानसभेत आमदार योगेश सागर यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबविण्यात आले. अंधेरी येथे आमदार अमित साटम यांनी प्रतिमा पूजन केले. घाटकोपर पूर्व विधानसभेत आ. पराग शाह यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी झाली. गोरेगाव विधानसभेत आमदार विद्या ठाकूर यांनी शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत मागाठाणे येथे कार्यक्रम पार पडला. तसेच मुंबईत शिवजयंती निमित्त भाजपा मुंबईच्या वतीने अभिवादन करणारे ५० हून अधिक भव्य डिजिटल बॅनर लावण्यात आले होते.
(हेही वाचा २५ वर्षांत युतीत सडले म्हणणारे अडीच वर्षांत संपले – देवेंद्र फडणवीस)
Join Our WhatsApp Community