अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढणार? शिष्यवृत्ती लाटणाऱ्यांमध्ये कृषीमंत्र्यांची शिक्षण संस्था

136
गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा आकडा फुगवून अधिकची शिष्यवृत्ती लाटणाऱ्या शाळांच्या यादीत सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांतील काही शाळांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा शिक्षणातील टक्का वाढवा यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ‘प्री मॅट्रिक’ शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ ते २०२१ या कालावधीत वाटप केलेल्या शिष्यवृत्तीचे केंद्र सरकारने लेखापरीक्षण केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. काही शाळांनी हॉस्टेल नसतानाही ते असल्याचे दाखवले, तर कोरोना काळात हॉस्टेल बंद असताना ते सुरू असल्याचे दाखवून ही रक्कम लाटली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जास्त विद्यार्थी, हॉस्टेल दाखवून शिष्यवृत्ती लाटणाऱ्या शंभरावर शाळा आहेत. त्यामध्ये सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या एन. एम. उर्दू हायस्कूल (अजिंठा), उर्दू हायस्कूल (अंभई), हिंदुस्थान उर्दू प्रा. शाळा (अंभई), नॅशनल उर्दू प्रा. शाळा (घाटनांद्रा), नॅशनल उर्दू हायस्कूल (सिल्लोड), नॅशनल उर्दू प्रा. शाळा (सिल्लोड) या ६ शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेने या सर्व शाळांना नोटिसा बजावल्या असून, संबंधितांकडून जादा शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक वसूल केलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेचा धनाकर्ष तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जमा करावा, असे या आदेशात म्हटले आहे.

याआधी झालेले आरोप…

याआधी टीईटी घोटाळा, महिला खासदाराबद्दल वादग्रस्त विधान, जिल्हाधिकाऱ्यांना दारूची ऑफर, सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी पैसे वसूल केल्याचा आरोप, वाशीम गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोप अशा विविध कारणांनी सत्तार अडचणीत आले होते. यातील काही प्रकरणांमध्ये चौकशीही सुरू आहे. असे असताना आता आणखी नवीन आरोप झाल्याने सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.