प्रभू रामचंद्रांना राष्ट्रपिता मानत नसाल तर गांधींना का? रणजित सावरकर यांचा एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात परखड सवाल

127

जर आपण प्रभू रामचंद्र यांना राष्ट्रपिता मानत नसलो, तर गांधींना कसे काय, गांधींनी देशाला जन्म दिला नाही, हा अत्यंत पुरातन देश आहे. गांधींनी स्वातंत्र्याची मागणी १९३० साली केली. त्यांचे १९३०चे आंदोलन मागे घेतांना गांधी भगतसिंग यांना वाचवू शकले असते, पण ते वाचवू शकले नाही. १९४२चे आंदोलन ब्रिटिशांनी अवघ्या ५ दिवसांत संपवले तेव्हा विमानातून मशीन गणने फायरिंग करून शेकडो क्रांतीकारकांना ठार केले. त्याचाही गांधींनी एक शब्दाने निषेध केला नाही. पुढे ५ वर्षांनी १९४२चे आंदोलन सुरु झाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले पण देशाचे विभाजन झाले. भारताच्या फाळणीमध्ये २० लाख लोक मारले गेले. याला कारण असे आहे की, सत्तेच्या हव्यासामुळे यांनी फाळणीची तारीख ११ महिने आधी घेतली. त्यावेळी प्रशासन, पोलीस आणि सैन्य यांची विभागणी झाली नसल्यामुळे दंगली झाल्या, २० लाख लोक मारले गेले, अशा शब्दांत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी गांधींचा राष्ट्रपिता म्हणून संबोधन करण्याच्या मुद्द्याचा प्रतिवाद केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीवर शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी ‘प्रेस कॉन्फरन्स’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी वाहिनीच्या संपादक मंडळाकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.

प्रश्न : राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर माफी मागितल्याचा आरोप केला, त्यावर काय म्हणणे आहे?

रणजित सावरकर : फेब्रुवारी १९४२ मध्ये महात्मा गांधी यांना एका मूर्ख माणसाने प्रश्न केला होता की, तुम्ही ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात ‘मोस्ट ओबिडियन्ट सर्व्हन्ट’ असे का लिहिता? तेव्हा गांधींनी उत्तर दिले होते, ते माझे विरोधक आहेत, पण ही माझी सभ्य भाषा आहे, पत्र लेखन करताना मी ती भाषा सोडू इच्छित नाही. तेव्हा गांधींनी जे उत्तर दिले होते, तेच उत्तर राहुल गांधींसाठी योग्य आहे.

प्रश्न : गांधींनी सांगितल्यावर वीर सावरकर यांनी माफीचा अर्ज केला होता का?

रणजित सावरकर : गांधींनी सांगितल्यानंतर सावरकर यांनी माफी मागितली, हे म्हणणे योग्य नाही, तेव्हा सर्व कैदी अर्ज करायचे, वीर सावरकर यांनी माफी मागितली असे म्हणता येणार नाही, त्यांनी आवेदन केले होते आणि तेही स्वतःसाठी नाही, तर सहकाऱ्यांसाठी केले होते. शेवटच्या पिटिशन आधी गांधी यांनी त्यांना सांगितले होते. ते पत्र आमच्याकडेही आहे. गांधींनी सावरकर यांच्या छोट्या भावाला ‘वीर सावरकर यांनी पिटिशन करावी’ असे सांगितले होते. अशी पिटिशन करण्यासाठी गांधींचेही समर्थन होते. ती पिटिशन याचिका असते, त्याला माफीनामा म्हणत नाही. आपण कोर्टात जाऊन याचिका करत असतो.

प्रश्न : सावरकर यांनी त्याच्या अर्जात क्लिमेंसी असा उल्लेख केला होता, त्यावर काय म्हणणे आहे?

रणजित सावरकर : १९११ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती, तेव्हा यांनी सर्वच बंदीवानांना सोडून देण्याचा निर्णय घेतला होता, १३ मे १९१३ मध्ये सावरकरांनी पहिला अर्ज केला होता, तो त्यांनी सुटकेसाठी केला नव्हता, तर तेव्हा अंदमान जेलचा नियम होता कि, बंदीवानांना केवळ ६ महिने कोठडीत ठेवायचे नंतर त्यांना कोठडीतून बाहेर काढायचे, क्रांतीकारकांना ३ वर्षे बाहेर काढले नव्हते म्हणून ती पिटिशन होती. १९११ मध्ये त्यांनी २ ओळीचे पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी सुटकेचा उल्लेख केला होता, ज्याच्या बदल्यात राजकारणात सहभाग घेणार नाही असा क्लिमेंसी म्हणून उल्लेख केला आहे, पण वीर सावरकर कायम म्हणायचे कि शत्रूला दिलेले वचन हे तोडण्यासाठीच असते. वीर सावरकर हे प्रॅक्टिकल, कृष्णनीती अवलंबणारे होते.

प्रश्न : सावरकर आणि संघ यांच्यात मतभेद का होते?

रणजित सावरकर : वीर सावरकर यांनी रत्नागिरीतच हिंदू महासभा स्थापन केली होती, ते पूर्वीपासून हिंदु महासभेसोबतच होते. संघ हा हिंदू महासभेचाच भाग होता, हेगडेवार हे नागपूर हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते. पुढे जाऊन गोळवलकर गुरुजी आणि वीर सावरकर यांच्यात धर्माच्या आधारे मतभेद झाले. वीर सावरकर हे व्यक्तिगत पातळीवर ईश्वर मानीत नव्हते. ते रूढी परंपरेवर बोलायचे, पण गोळवलकर गुरुजी यांचे विचार चातुर्वर्णाचे होते, गांधीही चातुर्वर्ण मानायचे. त्यामुळे खरे तर असे विचारले पाहिजे होते की, गोळवलकर गुरुजी यांनाही गांधींनी सोबत का घेतले नाही? गांधींचे विचार अत्यंत विकृत होते, ते म्हणायचे की, प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार शिक्षण घेता येईल, म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला सैन्याचे शिक्षण घेता येईल, एखाद्या अस्पुश्याला वैद्यकीय शिक्षण घेता येईल, परंतु त्यांना व्यवसाय मात्र पिढीजात करावा लागेल. एखाद्या भंगी समाजाचा मुलगा डॉक्टर बनला तरीही त्याने पोटासाठी शौचालयच साफ करायचे आहे, ही गांधींची अमानुषता आहे, असे डॉ. आंबेडकर स्वतः म्हणाले आहेत.

प्रश्न : नेहरूंवर तुम्ही का आरोप करता?
रणजित सावरकर : राहुल गांधी जे आरोप करत आहेत, ते खोटे आरोप आहेत, मी जे नेहरूंच्याबद्दल बोललो आहे, नेहरू आणि लेडी माउंट बॅटन यांच्यासोबत काय व्यक्तिगत संबंध होते यावर मला काही म्हणायचे नाही. तुम्ही इंडियन आर्मी ऍक्ट बघा, त्यात म्हटले आहे ‘जर कोणी अधिकारी शत्रूच्या महिलेशी मैत्री करतो, तर ते देशविरोधी कृत्य ठरते. लेडी माउंट बॅटन यांच्या मुलीने लिहिले आहे कि, नेहरू पंतप्रधान असताना दररोज लेडी माउंट बॅटन यांना पत्र लिहायचे, त्यात पहिला आणि शेवटचा परिच्छेद वैयक्तिक असायचा आणि मधला भाग त्यांची दिवसभरातील दैनंदिनी असायची. ही माहिती अधिकृत रेकॉर्डवर आहे, ही पत्रे आजही ब्रिटनमध्ये आहेत. हा राष्ट्रद्रोह आहे. एक पंतप्रधान हनी ट्रॅप मध्ये येऊन १२ वर्षे पत्रे लिहीत होता. माउंट बॅटन हे शेवटपर्यंत ब्रिटनचे राजविधिज्ञ होते. नेहरूंच्या व्यक्तिगत संबंधांमुळेच माउंट बॅटन यांना भारताचे पहिले गव्हर्नर नेमण्यात आले. त्यामुळे परिणाम वाईट झाले. कारण माउंट बॅटन यांनी असा निर्णय घेतला की, भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्यासमोर उभे राहणार नाही. त्यामुळे २० हजार महिलांचे अपहरण झाले असतानाही संरक्षण मंत्री बलदेव सिंग यांना भारतीय सैन्य वापरता आले नाही. यासंबंधी बलदेव सिंग यांनी वल्लभभाई पटेल पत्र लिहिले आहे, त्याची प्रत आपल्याकडे आहे.  त्या पत्रात बलदेव सिंग असेही लिहितात की, गोळवलकर गुरुजी यांच्याशी बोलून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुकड्या मदतीसाठी पाठवा, पण यातील काही झाले नाही.

प्रश्न : राहुल गांधी यांच्यावरील टीकेवर तुम्ही आता का उत्तर देता?
रणजित सावरकर – राहुल गांधी जे आरोप करतात, ते अनेकदा झाले आहेत, मी त्यावर त्या त्यावेळी उत्तर देत आलो, पण यावेळी मी ठरवले कि मीही प्रश्न विचारणार. मी स्वतः संशोधक आहे. २० वर्षांपासून वीर सावरकर यांची बदनामी होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.