रविवारी घेण्यात येणारी म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही परीक्षा रद्द होत असल्याची माहिती ट्वीटरवरून दिली. मात्र यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा परीक्षार्थींची माफी मागितली असली तरी आज भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले.
जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा
यावेळी निदर्शनात सहभागी झालेल्या आंदोलन कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. यासह अभाविपच्या या आंदोनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे तेथील परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरून अनेक विद्यार्थ्यांसह अभाविपने जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला. यासह आव्हाड पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत असल्याचा आरोप देखील अभाविपकडून करण्यात आला.
म्हाडाची परीक्षा जानेवारीमध्ये होणार
म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा जानेवारीमध्ये होणार असून राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यासह जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले, “सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील.”
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना ताब्यात
पुणे सायबर पोलिसांकडून खळबळजनक कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे, औरंगाबाद आणि पुण्यातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे
Join Our WhatsApp Community