संभाजीनगरचा तीढा सुटला, दसऱ्याच्या मुहुर्तावर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या?

132

संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाचा तीढा अखेर सुटला असून, दसऱ्याच्या मुहुर्तावर सर्व ३६ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. १५ ऑगस्टला ध्वजारोहण केलेल्या बहुतांश मंत्र्यांकडे त्या-त्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होऊन ८३ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीत. संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यासाठी एकाहून अधिक नावे शर्यतीत असल्याने शिंदे-फडणवीसांसमोर पेच निर्माण झाला होता. औरंगाबादमधून अतुल सावे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार, तर जळगावातून गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन इच्छुक होते. या सर्वांकडून आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू होती. ध्वजारोहणासाठी संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी संदीपान भुमरे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, विभागीय स्तरावरील मोठ्या जिल्ह्यांतील विकास वेग लक्षात घेता संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी भाजपकडे असावी, असे वरिष्ठ नेत्यांचे मत होते. तर संभाजीनगरमधील उद्धव गटाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी आपल्याकडे हे पद रहावे, असा शिंदे गटाचा आग्रह होता.

दोन्ही पक्षांतील चढाओढींत शिंदे गट संभाजीनगर आणि जळगाव राखण्यात यशस्वी ठरला असून, संभाजीनगरसाठी संदिपान भुमरे आणि जळगावसाठी गुलाबराव पाटील यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. या दोघा कॅबिनेट मंत्र्यांकडे तुलनेने कमी महत्त्वाचे खाते असल्याने पालकमंत्रीपदासाठी त्यांचा प्राधान्याने विचार झाल्याचे कळते. अन्य जिल्ह्यांचा विचार करता १५ ऑगस्टला ध्वजारोहण केलेल्या बहुतांश मंत्र्यांकडे त्या-त्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व दिले जाईल. शिवाय मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत एका मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांचे पालकत्व देण्याचा विचार सुरू आहे.

फडणवीसांचे पुण्याकडे लक्ष

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याकडे जातीने लक्ष देत आहेत. बारामती या पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी फडणवीसांनी पुण्याचे पालकमंत्रीपद सांभाळावे, अशी वरिष्ठ नेतृत्त्वाची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे कळते.

( हेही वाचा: शी जिनपिंग नजरकैदीत, चीनमध्ये घडणार सत्तांतर? )

संभाव्य पालकमंत्री

१) देवेंद्र फडणवीस – नागपूर, पुणे
२) सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गडचिरोली
३) चंद्रकांत पाटील – कोल्हापूर, वर्धा
४) राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, बीड
५) गिरीश महाजन – नाशिक, अमरावती
६) दादा भुसे – धुळे, भंडारा
७) गुलाबराव पाटील – जळगाव, बुलडाणा
८) रवींद्र चव्हाण – ठाणे, वाशिम
९) मंगलप्रभात लोढा – मुंबई शहर, मुंबई उपनगर
१०) दीपक केसरकर – सिंधुदुर्ग, पालघर
११) उदय सामंत – रत्नागिरी,  रायगड
१२) अतुल सावे – नांदेड, लातूर
१३) संदिपान भुमरे – औरंगाबाद
१४) सुरेश खाडे – सांगली, अकोला
१५) विजयकुमार गावित – नंदुरबार, गोंदिया
१६) तानाजी सावंत – उस्मानाबाद, परभणी
१७) शंभूराज देसाई – सातारा,  सोलापूर
१८)अब्दुल सत्तार – जालना
१९) संजय राठोड – यवतमाळ, हिंगोली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.