महाराष्ट्रात दबंगगिरी

मागील वर्षभरात या काही घटनांमुळे महाविकास आघाडी कशा पद्धतीने चर्चेत राहिली, याचा थोडक्यात आढावा घेऊ.

90

राज्यात ठाकरे सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होतील. मात्र हे सरकार विविध कारणामुळे चर्चेत राहिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर ठाकरे सरकावर टीका होत असतानाच, आता किरीट सोमय्या यांच्या घराबाहेरील पोलिस बंदोबस्तामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ही कारवाई सूडबुद्धीची असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे. मागील वर्षभरात या काही घटनांमुळे महाविकास आघाडी कशा पद्धतीने चर्चेत राहिली, याचा थोडक्यात आढावा घेऊ.

किरीट सोमय्या

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे बुधवारी नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपवली होती. दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते. त्यानंतर सोमय्या यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या घरोसमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये, असे सोमय्यांना सांगण्यात आले होते.

(हेही वाचाः सोमय्यांना केले स्थानबद्ध? फडणवीसांसह भाजपा नेत्यांनी केला सरकारचा निषेध)

नारायण राणे

जनआर्शीवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. ही कारवाई सुद्धा आकसापोटी केल्याचा आरोप भाजपाने केला होता. एवढेच नाही तर युवा सेनेने नारायण राणेंच्या बंगल्यासमोर आंदोलन केले होते. रत्नागिरी पोलिस अधीक्षक स्वतः राणे ज्या संगमेश्वर येथे थांबले होते, तिथे पोहचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरू केली. त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. त्याआधी पोलिस अधीक्षकांनी त्यांना सर्व गुन्ह्यांची माहिती दिली, तसेच भारत सरकारलाही कळवण्यात आले होते.

(हेही वाचाः आधीच ठरला राणेंच्या अटकेचा प्लॅन? हे आहेत खरे सूत्रधार)

अर्णब गोस्वामी

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक हे अलिबागमधील त्यांच्या बंगल्यात मृतावस्थेत आढळून आले होते. मे २०१८ मध्ये ही घटना घडली होती. अन्वय नाईक यांची मुंबईत कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड नावाची कंपनी होती. ते अलिबागजवळील कावीर येथील आपल्या घरी आले होते, त्यांनी तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

(हेही वाचाः अर्णव गोस्वामींच्या अटकेचे राजकीय पडसाद )

कंगनावरही कारवाई

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर ठाकरे सरकारवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर तिच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली.

(हेही वाचाः कंगनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली! आता पुढे काय?)

निवृत्त नौदल अधिकाऱ्यास मारहाण

कांदिवली पूर्व येथील निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हॉट्सअपवरुन फॉरवर्ड केले, म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे, अशा गुंडांना घाबरुन राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणाऱ्या काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही, असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावेळी केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.