ईडीमुळे ठाकरे सरकारला हुडहुडी… आणखी एक मंत्री अडकणार?

हा मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा असल्याचे समजत आहे.

121

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर सेनेला लगोलग आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेच्या वाशीम जिल्ह्यातील खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थानांवर ईडीने धाडी टाकल्याने, ठाकरे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्यातच ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री ईडीच्या रडारवर असून, या मंत्र्याची देखील लवकरच चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. हा मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा असल्याचे समजत आहे.

पवारांनी बोलावली बैठक

राज्यात ईडी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मंगळवारी बैठक बोलावली आहे. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवर ईडीची नजर असल्याने ही बैठक पवारांनी बोलावली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचाः मंत्री परबांनंतर सेनेच्या खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर!)

या नेत्यांवर सोमय्यांचा आरोप

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीशी संबंधित 11 जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावे आहेत. या 11 जणांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधित तिघांचा समावेश आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतो आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्यात त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तरं देतील पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वाझे व इतरांच्या जवाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसशी संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

(हेही वाचाः ईडीच्या कार्यालयात भाजपचा पदाधिकारी डेस्क अधिकारी! संजय राऊतांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.