अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात ‘आव्हान’! 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यापासून बचाव करण्यासाठी देशमुख सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी नुकतेच गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेले अनिल देशमुख यांच्यावर जे गंभीर आरोप केले, त्यांची चौकशी सीबीआयने करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्याला देशमुख सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. त्याआधीच या प्रकरणातील याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आदेश देण्यापूर्वी अ‍ॅड. पाटील यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे लागणार आहे. अशा प्रकारे देशमुख यांना अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात ‘आव्हान’ असणार आहे.

कोण आहेत अ‍ॅड. जयश्री पाटील? 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात केला आहे. त्या आरोपांची सीबीआयच्या वतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. पाटील यांनी केली होती. त्यावर न्यायालयाने हे आरोप चौकशी करण्याइतपत गंभीर आहेत का, यासाठी या प्रकरणाची सीबीआयने प्राथमिक चौकशी करून १५ दिवसात अहवाल द्यावा, असा आदेश दिला.

(हेही वाचा : परमवीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी सीबीआय करणार! )

काय म्हणाल्या अ‍ॅड. जयश्री पाटील?

अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचा तुमच्यावर वरदहस्त असेल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझे नाव पोलीस डायरीत येऊ दिले नाही. सरन्यायाधीशांनी म्हटले आहे, यांचे नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणला आहे. अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here