श्रध्दा जाधव यांच्यासह चार समिती अध्यक्षांचे पत्ते कापले! कारकर,रेडकर मात्र कायम

माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी परेल-शिवडीमधून सातत्याने निवडून येत असल्याने शिवडीतील अंतर्गत राजकारणाच्या त्या शिकार झाल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या वैधानिक समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बेस्ट समिती वगळता अन्य सर्व समित्यांवरील अध्यक्षांना कायम ठेवले गेले आहे. तरी सहा विशेष समित्यांपैकी चार अध्यक्षपदी खांदेपालट करण्यात आली आहे. विधी समिती आणि महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांना कायम ठेवत उर्वरित चार विशेष समिती अध्यक्षांना नारळ देण्यात आला. यामध्ये विद्यमान स्थापत्य समिती अध्यक्षा व माजी महापौर श्रध्दा जाधव यांचाही समावेश आहे. स्थापत्य समितीचे काम अवघ्या सहा महिन्यांमध्ये चोख पार पाडल्यानंतर आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर या समितीला न्याय दिल्यानंतरही पक्षाने या पदावर संधी न देण्यामागे पक्षातील वाढत्या विरोधाच्या त्या शिकार झाल्याचे बोलले जात आहे. शिवडीतील अंतर्गत राजकारणात त्यांना अशाप्रकारे शह देण्यात आल्याने शिवसेनेतील अंतर्गत राजकारण आता समोर येऊ लागले आहे.

राजकीय षडयंत्र

मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदासाठी शिवसेनेने विद्यमान अध्यक्ष श्रध्दा जाधव यांचा पत्ता कापून शिवडीतील शिवसेना नगरसेवक दत्ता पोंगडे यांना अध्यक्षपदी, तर सचिन पडवळ यांना उपाध्यक्षपदी उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी परेल-शिवडीमधून सातत्याने निवडून येत असल्याने शिवडीतील अंतर्गत राजकारणाच्या त्या शिकार झाल्याचे बोलले जात आहे. जाधव यांच्यासारख्या अनुभवी नगरसेवकाला पुन्हा संधी न देण्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे शिवडीतील राजकारणामधील अंतर्गत वाद आता यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

(हेही वाचाः सुधार समितीवर सदा परब यांची हॅट्रीक!)

अशी आहे श्रद्धा जाधव यांची कारकीर्द

सन २०१० ते २०१२ या कालावधीत महापौरपद भूषवल्यानंतर सन २०१२ ते २०१७पर्यंत त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नव्हती. पण २०१७ला पुन्हा निवडून आल्यानंतर माजी महापौर विशाखा राऊत यांना स्थापत्य शहर समिती व त्यानंतर सभागृहनेतेपद दिल्यामुळे श्रध्दा जाधव यांनी पक्षाकडे समिती अध्यक्षपदाची मागणी केली. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना स्थापत्य शहर समिती अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. त्यामुळे जाधव यांचा पक्षातील वाढत्या विरोधामुळेच पत्ता कापल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

राजुल पटेल यांना आरोग्य समिती अध्यक्षपदाचे उमेदवारी

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य समिती अध्यक्षाची जबाबदारी महत्वाची मानली जात आहे. विद्यमान अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांना बाजूला करुन पक्षाने ज्येष्ठ नगरसेविका व माजी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांना अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. पटेल यांना दोन वर्षांपूर्वीच अध्यक्षपदाची संधी होती. पण पतीचे आजारपण आणि त्यांच्या निधनानंतर उद्भवलेली परिस्थिती यामुळे त्यांनी मागील दोन वर्षे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. पण शेवटच्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. जोगेश्वरी पश्चिम येथील राजुल पटेल यांना आरोग्य समिती अध्यक्षपदी संधी देतानाच वर्सोवा येथील शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे यांना बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. विद्यमान बाजार व उद्यान समिती अध्यक्षा चंद्रावती मोरे यांना बाजूला करत खोपडे यांना संधी देण्यात आली आहे.

(हेही वाचाः बेस्ट समितीवर पाचव्यांदा चेंबूरकर!)

स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्षपदासाठी गोरेगाव येथील शिवसेना नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील चार वर्षांमध्ये टेंबवलकर यांना कुठल्याच महत्वाच्या समित्यांवर सदस्य म्हणून घेण्यात आले नव्हते. अखेर शेवटच्या वर्षी त्यांना स्थापत्य उपनगरे समिती अध्यक्षपद देण्यात येत आहे. विद्यमान अध्यक्ष श्रीकांत शेट्ट्ये यांना पुन्हा संधी न देता पक्षाने पश्चिम उपनगरातील टेंबवलवकर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कारकर, रेडकर मात्र कायम

विद्यमान विधी व महसूल समिती अध्यक्ष हर्षद कारकर आणि महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर यांना मात्र पदावर कायम ठेवण्यात आले आहे. या दोन समिती अध्यक्षांना कायम ठेवत उर्वरित चार विशेष समित्यांचे अध्यक्ष बदलण्यात येत आहेत. या सर्व अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज महापालिका सचिव संगीता शर्मा यांच्याकडे मंगळवारी सादर केले.

(हेही वाचाः ५ पेक्षा अधिक रुग्ण असलेली सोसायटी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’!)

विशेष समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे पक्षनिहाय उमेदवार

स्थापत्य शहर समिती

अध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना: दत्ता पोंगडे

भाजप: रिटा मकवाना

उपाध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : सचिन पडवळ

भाजप : नेहल शहा

स्थापत्य उपनगरे समिती

अध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना: स्वप्निल टेंबवलकर

भाजप: प्रतिमा शिंदे

उपाध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : सदानंद परब

भाजप : योगिराज दाभाडकर

सार्वजनिक आरोग्य समिती

अध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : राजुल पटेल

भाजप : बिंदू त्रिवेदी

उपाध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : वसंत नकाशे

भाजप : प्रियंका मोरे

बाजार व उद्यान समिती

अध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : प्रतिमा खोपडे

भाजप : साक्षी दळवी

उपाध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : तुकाराम पाटील

भाजप : रजनी केणी

विधी व महसूल समिती

अध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : हर्षद प्रकाश कारकर

भाजप : संदीप दिलीप पटेल

उपाध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : अॅड. संतोष खरात

भाजप : प्रतिभा गिरकर

महिला व बाल कल्याण समिती

अध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : राजराजेश्वरी रेडकर

भाजप : दक्षा पटेल

उपाध्यक्षपदाचे उमेदवार-

शिवसेना : उर्मिला पांचाळ

भाजप : प्रितम पंडागळे

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here