हे तर गलिच्छ राजकारण, सुशांत आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

146

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरून अप्रत्यक्षपणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रीया दिली असून,  सुशांतच्या आत्महत्येचे गलिच्छ राजकारण केले जात असल्याची टीका आदित्य यांनी केली आहे. या प्रकरणावरुन ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच असल्याचे आदीत्य ठाकरे म्हणालेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.  मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांना कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल, असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईस या भ्रमात कोणी राहू नये असे आदित्य म्हणालेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.