शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचे भेटण्याचे आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वीकारले असून मी त्यांना निश्चितच भेटणार. ते मातोश्रीवर भेटायला आले तरी चालणार आहे, असे आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंना म्हटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि सुहास कांदेंची शुक्रवारी मनमाडमध्ये भेट होईल का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले
आदित्य ठाकरे, आज नाशिकमध्ये असून त्यांनी काळाराम मंदिरात जाईन रामाचे दर्शन घेतले, यावेळी ते बोलत होते. तसेच दुपारी ते मनमाड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तर या मेळाव्यात आदित्य ठाकरे सुहास कांदेंच्या आरोपांना काय उत्तर देणार, याची चर्चा आता सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सुहास कांदेंनी तुमच्या भेटीची वेळ मागितली आहे. तुम्ही त्यांना वेळ देणार आहात का? अशी विचारणा केल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, चालेल. निश्चित भेटू. त्यांनी मातोश्रीवर यावं. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलो. आता आपण मंदिरात आहोत. त्यामुळे इथे राजकारण नको, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सुहास कांदेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान
आदित्य ठाकरेंबद्दल आदर आहे. ते बाळासाहेबांचे वंशज आहेत. ठाकरे घराण्याबद्दलही आदर आहे. मी आज आदित्य ठाकरेंना थेट आव्हान देतो की, त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. मी लगेच राजीनामा देतो. मी परत निवडणूक लढवतो. परत बाळासाहेबांचा सैनिक म्हणून निवडणूक लढून विधानसभेत पोहोचेल, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पर्यटन खात्याचा निधी का दिला नाही, पर्यटन खात्यातील एक प्रकल्प नांदगावमध्ये दाखवा मी लगेच राजीनामा देतो, असे म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले आहे.
Join Our WhatsApp Community