आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील प्रकल्पाला कोरोनाने रोखले…

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील माहिम किल्ला ते वांद्रे किल्ला या दरम्यान बोर्ड वॉक प्रकल्पाच्या कामाला कोरोनामुळे खिळ बसली आहे. या प्रकल्पाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. याचा विस्तृत आराखडा बनवून निविदा प्रक्रिया राबवण्याचे काम, चार महिन्यांपूर्वी प्रस्तावित करण्यात आले होते. पण कोरोनाचा जोर वाढल्यामुळे मार्चपर्यंत या कामाला गती देण्याचे स्वप्न बारगळले आहे.

कसा असेल बोर्ड वॉक?

मुंबईतील माहिम ते प्रभादेवीतील श्री सिध्दी विनायक मंदिर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गाचे, तसेच त्यावरील पदपथांचे नूतनीकरण वेगळ्याप्रकारे करण्यात येत असताना, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिम किल्ला ते वांद्रे किल्ला हा रस्ता सायकल ट्रॅकने जोडण्याची संकल्पना मांडली आहे. हा बोर्ड वॉक प्रकल्प राबवताना पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग करुन सायकल मार्गिका, पादचारी मार्गिका बांधली जाणार आहे. तर ५ मीटर रुंद आणि वांद्रे–वरळी सागरी सेतू दृश्यासाठी अडथळा न ठरता याच्या बांधकामाचे नियोजन करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः उशिरा सुचलेले शहाणपण! सर्व रुग्णालयांचे फायर-ऑक्सिजन ऑडीट करण्याचे आदेश)

आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

या प्रकल्पासाठी चार महिन्यांपूर्वी खुद्द आदित्य ठाकरे यांनी माहिम चौपटीवरील सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करताना, ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्यावतीने विस्तृत आराखडा बनवून, त्यानुसार निविदा काढण्याचेही निर्देश त्यांनी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना दिले होते. पण त्यानंतर कोविडने जोर धरला आणि या प्रकल्पाचे काम रखडले. याबाबत दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी मान्सून पूर्व कामांचा आढावा घेताना काही प्रकल्पांचाही आढावा घेतला. यामध्ये त्यांनी वांद्रे किल्ला ते माहिम किल्ला जोडणाऱ्या बोर्ड वॉकचाही आढावा घेत, वांद्रे-वरळी सेतूच्या दृश्यासाठी अडथळा ठरणार नाही अशा पद्धतीने बांधकामाचे नियोजन करण्याचे निर्देश महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here