मूक प्राण्यांना न्याय मिळायला हवा – आदित्य ठाकरे

117

जगभरात वातावरणीय बदलांचा परिणाम दिसून येत आहे. निसर्गातील विविध प्राणी-पक्ष्यांना त्रास भोगावा लागत आहे. माणूस आपल्याविरोधातील अन्यायाबाबत बोलतो. मात्र जंगलातील मूक प्राण्यांना त्यांच्याविषयी बोलता येत नाही. समाजातील दबलेल्या आवाजांसह जैवविविधतेतील दबलेल्या आवाजांना राजकीय व्यासपीठावर ऐकायला हवे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

ठाकरे कुटुंबाला निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचा वारसा

जागतिक कासव दिनानिमित्ताने मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकार स्थापन झाल्यानंतर पर्यावरण आणि वन विभागावर काम करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी प्रामुख्याने लक्ष दिल्याचेही आदित्य ठाकरे आवर्जून म्हणाले. हिरवळ प्रतिष्ठान आणि शेकरु वन्यजीव संस्थेच्यावतीने ‘अँटिनावालं कासव’ या लघुपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी ठाकरे यांनी निसर्गसंवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ठाकरे कुटुंबाला निसर्ग  आणि वन्यजीव संवर्धनाचा बहुमूल्य वारसा मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या स्थापनेसह पर्यावरण संवर्धनासाठी आग्रहाची भूमिका घेत पर्यावरण विभाग स्वतः जवळ घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा मनसे नेते वसंत मोरे ‘त्या’ महिलेसाठी बनले ‘दीर’)

आवश्यक बदल घडवून पर्यावरण संवर्धन करायला हवे

भारताच्या शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात ५० अंशापर्यंत पोहोचले आहे. नुकत्याच झालेल्या अयोध्या दौ-यात ४५ अंश तापमानाचा मला अनुभव आला. आपल्या मुंबईतही कमाल तापमान ४०-४२ अंशापर्यंत पोहोचले आहे. १२० दिवसांच्या पावसाळी ऋतुमानात ७० दिवसांतच मुसळधार पाऊस होतो, हुडहुडी भरणारी थंडी गायब होते, तर उन्हाळा फारच गरम होतो. या वातावरणीय बदलांना सामोरे जाताना आता आपण आवश्यक बदल घडवून पर्यावरण संवर्धन करायला हवे, अशी आग्रही भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. पर्यावरण संवर्धनामुळेच आपल्याला मोकळा श्वास मिळेल, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी स्थापन होण्याअगोदर पर्यावरण आणि वनविभाग हा स्पीडब्रेकर समजला जायचा. मात्र या दोन्ही विभागासह दुर्लक्षित झालेल्या कांदळवन विभागाला आता ठाकरे सरकारच्या काळात कासवाची गती नक्कीच मिळाली. गेल्या दोन वर्षांत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत २० वन्यजीव क्षेत्रे तसेच विविध अभयारण्ये आणि धोकादायक संवर्धित क्षेत्रेही घोषित करुन निसर्ग संवर्धनाचा आमचा मानस असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.