शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, तोफ पुन्हा एकदा रणांगणात आली आहे, असे म्हणत त्यांना आनंद व्यक्त केला आहे. ते सोलापुरात बोलत होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
या देशात, राज्यात हुकूमशाहीच्या दिशेने आपण चाललो आहोत का.. हा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. जो कोणी या सरकारविरोधात बोलत असताना, तुरूंगात टाकू किंवा चौकशी करू अशी सर्वात पहिली धमकी दिली जाते. जे कोणी राजकीय मंडळी सत्य बोलण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारविरोधात काही बोलले तर दबावतंत्राचा वापर केला जातो, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला.
यापुढे बोलताना ते असेही बोलले की, संजय राऊत डरपोक नाहीत. संजय राऊत हे गद्दार नाहीत. संजय राऊत यांच्याविरोधात दबाव तंत्र वापरण्यात आले होते. पण ते पळून गेले नाहीत. आज राजकीय लोकांवर दबावतंत्र वापरून कारवाई होतेय. उद्या पत्रकारांवर, लोकांवरही अशाच प्रकारे कारवाई होऊ शकते. ही धोक्याची घंटा आहे. संजय राऊत हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते उगाच नाव लावून फिरत नाही, त्यांनी मुखवटा लावलेला नाही. हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – शरद पवार ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार नाहीत, सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण)