केंद्रीय मंत्री नारायण राणेंनंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान आणि इतरांच्या फोनवर आदित्य ठाकरेंच्या नावाने फोन आल्याचा दावा बिहार पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाबाबत सूचक विधान केले आहे.
(हेही वाचा – सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप)
शिंदेंचं सूचक विधान
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत नागपुरात बोलत असताना एकनाथ शिंदेंनी संकेत दिले आहेत. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणात जनतेच्या मनात संभ्रम होता आणि आजूनही आहे, मी त्याची माहिती घेऊल बोलतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काय केले शेवळेंनी आरोप
दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बुधवारी लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘एयू’नावाने 44 फोन कॉल आले होते. ‘एयू’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले आहे, असा गंभीर आरोप केला. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होत आले आहेत. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे.
शेवाळेंनी लोकसभेत अशीही केली मागणी
या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून करण्यात आली. मात्र, तिन्ही यंत्रणांच्या अहवालात तफावत आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘एयू’अशा नावाने 44 कॉल आले होते. या ‘एयू’बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर बिहार पोलिसांनुसार ‘एयू’ म्हणजे ‘आदित्य उद्धव’ आहे. सीबीआयने ‘एयू’बाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला कॉल केलेला ‘एयू’ नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी शेवाळेंनी लोकसभेत केली आहे. शिंदे गटातील नेत्यानेच उद्धव ठाकरे यांच्या मुलावर आरोप केल्याने आता राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.