आमच्यासाठी राज्यात फक्त मावळ लोकसभाच नाही तर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत. कारण आज राज्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. राज्यातील सर्व उद्योग धंदे राज्याबाहेर पाठवले जात आहेत. आमच्या तोंडाचे घास देखील पळवले जात आहे. उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र कोलमंडले आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रत्येक सीटवर जिंकून येणे हे खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जिद्दीने आणि ताकदीने जिंकणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात राजकीय स्थिरताच नाही
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, उदय सामंत ज्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याबद्दल किती माहिती आहे हे मला माहित नाही. कारण मागच्या वेळेस जेव्हा वेदांत फॉक्स कॉन आणि टाटा एअरबस इथून जेव्हा निघून गेले हे त्यांना माहितीच नव्हते म्हणून मला त्यांच्यावर जास्त टीका करायची नाही. आधी त्यांनी स्वतःच्या खात्याची ओळख करून घ्यायला हवी, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली आहे. आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या राज्यासाठी इकॉनॉमिक कौन्सिल बनवले त्या कौन्सिलचे अध्यक्ष गुजरातमध्ये जाऊन 17000 कोटीची गुंतवणूक करत असतात. शेवटी राज्यात उद्योगधंदे तेव्हाच येतात जेव्हा उद्योगधंद्यांना वाटते की, राज्यामध्ये राजकीय स्थिरता आहे. मात्र आपल्या राज्यात राजकीय स्थिरताच नाही. मागच्यावेळी दाओसमध्ये जे 80 हजार कोटी रुपयांचे करार झाले त्यातले एकही करार अमलात आला नाही. कदाचित उद्योगधंदे चालकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल. जे नेते आपल्याच पक्षाचे चाळीस आमदार घेऊन पळाले ते कदाचित आपल्याही मॅनेजरना देखील घेऊन पळून जातील असे त्यांना वाटत असेल, म्हणून ते आपल्या राज्यात गुंतवणूक करत नाहीत, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
Join Our WhatsApp Community