शिवसेनेच्या स्थापनेनंतर तिची राडेबाज संघटना म्हणून ओळख निर्माण झाली. पण कालांतराने राडेबाजीची ही ओळख युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे पुसून टाकून, पक्षाला वेगळी ओळख निर्माण करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेना भवनसमोरील शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीनंतर, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना ही सर्टीफाईड गुंडा पार्टी असल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यांच्या या विधानामुळे पक्षाचा चेहरामोहरा, तसेच ओळख बदलू पाहणाऱ्या आदित्य ठाकरे यांची राऊतांनी प्रचंड नाराजी ओढवून घेतली असून, त्यांच्या लिस्टमध्ये आता राऊत हे ब्लॅक लिस्टमध्ये गेल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले होते राऊत?
अयोध्या राम मंदिर जमीन खरेदी मुद्यावरुन शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्याचा निषेध म्हणून भाजप जनता युवा मोर्चाने शिवसेना भवनवर मोर्चा काढला. हे आंदोलन पार पडल्यानंतर शिवसेना भवनखाली असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या तिथून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पकडून मारहाण केली. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना ही सर्टीफाईड गुंडा पार्टी असल्याचे सांगत मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही गुंडगिरी दाखवू, असे म्हटले होते.
(हेही वाचाः भाजपला शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका! )
आदित्य ठाकरे शांत
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांना शाबासकी दिली. पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले असले, तरी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात अजूनही वाच्यता केलेली नाही. एरव्ही ट्विटरवरुन प्रत्येक गोष्टीची माहिती देणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी एकही पोस्ट टाकली नाही किंवा त्या शिवसैनिकांचे कौतुकही केले नाही.
(हेही वाचाः ‘त्या’ शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार! )
आदित्य ठाकरेंना बदलायची आहे प्रतिमा
शिवसेनेतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांना राडा संस्कृती मान्य नसून ते पक्षाची प्रतिमा पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात त्यांनी शिवसेनेच्या यापूर्वीच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही व्याख्या बदलून, १०० टक्के समाजकारण आणि १०० टक्के राजकारण ही घोषणा केली. त्यामुळेच युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकप्रकारे शिस्तप्रिय अशी शिकवणूक ते देत असून, त्यांना जुन्या शिवसैनिकांच्या गुंड आणि राडेबाज संस्कृतीपासून त्यांना दूर ठेवायचे आहे. समाजकारण आणि राजकारणात सक्रिय होऊन काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे हे वेगळ्या संस्कृतीत वाढलेले आहेत. त्यांचा मित्रपरिवार हा मोठा असून त्यांच्यासमोर आपल्या पक्षाची ओळख ही गुंडापार्टी अशी झाल्यास ते त्यांच्या अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे त्यांना हा प्रकार आवडला नसून राडा इमेजपासून चार हात लांब राहूनच राजकारण आणि समाजकारण करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे शिवसेना भवन बाहेर झालेल्या राडेबाजी प्रकरणावरुन ते प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच संजय राऊत यांनी शिवसेना ही सर्टीफाईड गुंडापार्टी असल्याचे सांगितल्याने, ही नाराजी अधिकच वाढलेली आहे. त्यामुळेच त्यांनी संजय राऊत यांना ब्लॅकलिस्ट केल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः महापालिका निवडणूक जवळ येताच शिवसेनेला आठवला ‘मराठी’ माणूस)
Join Our WhatsApp Community