गुजराती मतदार निसटले म्हणून बिहारींना आदित्य ठाकरेंची साद?

शिवसेना-उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार अशी बरीच चर्चा रंगली होती आणि अखेर त्यांनी प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई यांच्यासोबत बिहारमध्ये जाऊन भेट घेतली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ठाकरे गट कमकुवत झाला आहे. सध्या पक्ष आणि चिन्हे कोणाचे यावरुन लढाई सुरु आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेचे महायुद्ध आता सुरु होण्याची शक्यता आहे.

मतांसाठी खटाटोप

ठाकरे गटासाठी मुंबई महानगरपालिका जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. ठाकरे नरेंद्र मोदींना दुखवण्याच्या नादात गुजराती मतदारांना दुखावले आहे. त्यामुळे गुजराती मतदार त्यांच्यापासून दूर गेले आहेत. खरं पाहता ठाकरे गट शिवसेना असल्यापासून त्यांना मिळत आलेली अमराठी माणसांची मते याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपासोबत असलेली युती. ही अमराठी मते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळत होती. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिल्यामुळे हे मतदार त्यांच्यापासून दूरावले असण्याची शक्यता आहे. त्यात त्यांचा पक्ष फुटला आहे.

(हेही वाचा उद्धवा अजब तुझी सेना! आजोबांनी केला होता परप्रांतीयांना विरोध, नातवाचे मात्र लोटांगण)

ठाकरे गटाचं ढोंगी हिंदुत्व

अशा परिस्थितीत त्यांना मोदी विरोधी मतांवर समाधान मानावे लागणार आहे. यासाठीच त्यांनी तेजस्वी यादव यांना साद घातल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेत बिहारी लोकांची मते त्यांना हवी आहेत, त्याचप्रमाणे ठाकरे गट मुसलमानांची मते मिळवण्याचा देखिल प्रयत्न करु शकतो. कारण राज्यपालांवर त्यांनी कठोर टीका केली आहे परंतु राहुल गांधींवर टीका न करता आपण त्यांच्या मताशी सहमत नाही एवढेच त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं ढोंगी हिंदुत्व हिंदुत्ववाद्यांना चांगलेच ठाऊक आहे. तरी तोंडी लावण्यापुरता हिंदुत्वाचा आधार घेत ठाकरे गट आता वेगळ्या मतदारांना साद घालणार आहे.

नेतृत्व कमकुवत आहे

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेले मतदार आपल्याकडे आकृष्ट व्हावे अशी खेळी ठाकरे आखत असले तरी ही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. त्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही हे उघड सत्य नाकारता येत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आदमार सोडून जातात याचा अर्थ नेतृत्वावरच विश्वास नाही किंवा नेतृत्व कमकुवत आहे असा होतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेऊन समाधान मानू नये. कारण मुंबई पालिकेची लढाई अटीतटीची आहे. अजूनही मुंबईतले नगरसेवक फुटले नसले तरी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करु शकतात. पूर्वी बाळासाहेब होते तेव्हा बाळासाहेबांकडे पाहुन मतदार मते द्यायचे परंतु आता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहुन मतदार मतदान करणार नाहीत. तर त्या विभागतल्या नगरसेवकांची प्रतिष्ठा, कामे इ. बाबी पाहुनच मतदान करणार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here