शिवसेनेने नुकतीच नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून, या यादीवर नजर टाकली तर या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत देखील आदीत्यशाहीच पहायला मिळाली आहे. आदित्यशाही म्हणण्याचे एकमेव कारण ते म्हणजे आदित्य ठाकरेंच्या जवळच्यांकडे सध्या प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आधीच शिवसेनेत युवा सेनेची लुडबुड असताना आता प्रवक्त्यांमध्ये देखील आदित्यशाहीच दिसून येत आहे. त्यामुळे जुनेजाणते शिवसैनिक पुरते नाराज असून, काहींनी ही नाराजी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली होती.
याआधीच आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय असलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची खासदारकी तसेच प्रवक्ते केल्याने शिवसेनेचे काही माजी खासदार, माजी मंत्री नाराज असताना आता नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये देखील आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतल्या लोकांनाच संधी दिल्याने भविष्यात ही नाराजी अधिक उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या काही जुण्याजाणत्या नेत्यांशी आणि माजी मंत्र्यांशी हिंदुस्थान पोस्टच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सध्या ज्या गोष्टी शिवसेनेत सुरू आहेत त्या न पटणाऱ्या आहेत. ज्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी इतकी वर्ष घाम गाळला त्या शिवसैनिकांना डावलून इतर पक्षातून आलेल्यांसाठी फक्त आदित्य ठाकरेंच्या मर्जीतले असल्याने सतरंजी अंथरली जात असल्याचे सांगत, नाराजी व्यक्त केली.
म्हणून यांना मिळाली का नवीन जबाबदारी?
नवीन प्रवक्त्यांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या अवतीभवती असणाऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या आणि ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांचा समावेश आहे. सचिन अहिर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघ सोपा जावा यासाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचमुळे आधी त्यांना शिवसेनेचे उपनेते पद देण्यात आले तर आता त्यांच्या गळ्यात प्रवक्ते पदाची माळ घालण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेल्या आनंद दुबे यांच्या देखील गळ्यात प्रवक्ते पदाची माळ घालण्यात आली आहे. तर शितल म्हात्रे, शुभा राऊळ आणि संजना घाडी या देखील आदित्य ठाकरेंच्या मर्जीतल्या असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
(हेही वाचाः स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकः भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदेंना स्थान नाही! राणेंनी व्यक्त केले आश्चर्य)
दलबदलूंना शिवसेनेत मानाचे स्थान
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या प्रवक्त्यांच्या यादीवर जर नजर टाकली तर दलबदलूंना शिवसेनेने मानाचे स्थान दिले की काय, असा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चुतर्वेदी, राष्ट्रवादी सोडलेले सचिन अहिर, आधी शिवसेनेत मग मनसे आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या संजना घाडी, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले भास्कर जाधव, काँग्रेस सोडलेले आनंद दुबे आणि शिवसेनेच्या माजी महापौर असलेल्या शुभा राऊळ यांनी देखील २०१४ मध्ये उमेदवारी नाकारल्याने मनसेत प्रवेश केला होता. मात्र, त्या पुन्हा शिवसेनेत आल्या त्यांना देखील शिवसेनेने प्रवक्ते केले आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये पक्ष बदलणाऱ्यांना महत्त्व आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबईच्या महापौर की सेनेच्या प्रवक्त्या?
मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर या मुंबईच्या महापौर आहेत की, शिवसेनेच्या प्रवक्त्या असा आरोप त्यांच्यावर वारंवार होत आहे. मात्र आता इतिहासात पहिल्यांदाच महापौर असलेल्या व्यक्तीला प्रवक्ते पद देण्याचा नवा पायंडा शिवसेनेने घातला आहे. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर म्हणून बाजू मांडणार की शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून बोलणार, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. मुंबई महापालिकेत मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये महादेव देवळे, दत्ता दळवी, डॉ. शुभा राऊळ, श्रध्दा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर आणि विश्वनाथ महाडेश्वर असे महापौर होऊन गेले. जेव्हा भ्रष्टाचार किंवा घोटाळ्याच्या आरोपावरुन महापालिकेत रणकंदन माजले, तेव्हा वृत्तवाहिन्यांवर आयोजित चर्चेत या महापौरांना कधीही सहभागी होता येत नव्हते. महापौर हे मानाचे पद असून, ते कोणत्याही एका पक्षाचे नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची बाजू मांडण्यास आजवरच्या प्रथा व परंपरेनुसार या महापौरांना चर्चेत सहभागी होण्यास कधीही परवानगी मिळत नव्हती. महापौर पदावरील व्यक्तीच्या मुखातून कोणतेही चुकीचे विधान गेले तर ते महापौरांचे विधान म्हणून ग्राह्य धरले जाते. या पदाचा मान राखण्यासाठीच आजवर या पदावर बंधने होती. मात्र किशोरी पेडणेकर या मागील वर्षभरात महापौर कमी पण, पक्षाच्या प्रवक्त्याच जास्त वाटत होत्या. मात्र आता त्यांना पक्षाने अधिकृत पक्षाचा प्रवक्ते पद देऊन शिवसेनेच्या आजवरच्या सर्व प्रथा आणि परंपरेलाच छेद दिला आहे.
(हेही वाचाः गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशी समितीवर फडणवीसांनी कोणता केला आरोप? )
हे आहेत शिवसेनेचे नवीन प्रवक्ते
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्त्यांबरोबरच अन्य प्रवक्त्यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात खासदार प्रियंका चतुर्वेदी, परिवहनमंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनीषा कायंदे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांचा समावेश करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community