युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना भेटी दिल्या. इथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरी आंगण बैठका घेतल्या. यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सुशांतसिंह प्रकरणाचा दाखला देत आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे विधान केले.
काय म्हणाले राणे?
जे जाहीर सभा घेऊ शकत नाही ते खळ्यात सभा घेण्यासाठी आले. आज काय शिवसेनेची स्थिती आहे. थोड्या दिवसांनी सुशांत सिंह राजपुतच्या केसमध्ये हाच आदित्य ठाकरे बैठकांना नसेल जेलमध्ये असेल, संजय राऊत पण असेल त्यांच्याबरोबर. ज्या शिवसेनेचे आता काहीही राहिलेले नाही त्यांचे १६० आमदार येणार म्हणता? ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी बोलू नये. कुठे गेले खोके, कसे जात होते ते? वेळ कुठली असायची, कुणाच्या हातात दिले, कुठल्या माळ्यावर जायचे? मला सगळे माहिती आहे. पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे रहायचे म्हणून मला त्यावर अधिक काही बोलायचे नाही. एकनाथ शिंदे हा पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे ठाकरेंनी खोके खोके बोलायचे सोडा निवडणुकीत तुमचे काहीही होणार नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.