मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-यापूर्वी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार याची घोषणा झाली हाेती. आता शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याची तारीख जाहीर केली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत, आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच शिवसेनेकडून असली आ रहे है, नकली से सावधान असे बॅनर अयोध्येत लावण्यात आले आहेत. या निमित्ताने शिवसेना- मनसेमधील वाद हा थेट आता अयोध्येत पोहोचला आहे.
मनसेची हिंदुत्वाची भूमिका नकली
अयोध्येत जे बॅनर झळकले आहेत, त्यावर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरल्यापासून, शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे, शिवसेनेने बॅनरमधून सूचित केले आहे.
( हेही वाचा: ‘बबली अजूनही नासमझ’, पेडणेकरांचा नवनीत राणांना टोला )
आदित्य ठाकरेंसोबत ही मंडळीही जाणार
या पोस्टरच्या बाबतीत स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, असली नकली काय आहे, ते पोस्टर कोणी लावले हे मला माहिती नाही. मात्र अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. प्रभू श्रीराम हे एका धर्माचे नसून ते सगळ्यांचेच भगवान आहेत. त्यांच्या दर्शनासाठी सगळेच जातात, पण काहीजण नकली भावनेतून जात आहेत, तर कोणी राजकीय असे राऊतांनी स्पष्ट केले. याआधी अयोध्येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले आहेत. आता 10 जूनला आदित्य ठाकरे जाणार आहेत. आदित्य ठाकरेंसोबत शिवसैनिक, युवासैनिक आणि शिवसेनेशी जोडलेले सर्वच लोक अयोध्येत जमा होतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community